पॉलिटेक्निक प्रवेशाने केला प्रवेशाचा विक्रम

पॉलिटेक्निक प्रवेशाने केला प्रवेशाचा विक्रम

Published on

पॉलिटेक्निक प्रवेशांचा विक्रम

आयटीआयच्या प्रवेशात नियोजनाचा अभाव

मुंबई, ता. १३ : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकच्या विविध शाखांच्या प्रवेशांबाबत केलेल्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. १० वर्षांतील प्रवेशांचा विक्रम यंदा तंत्रशिक्षण संचालनालयाने मोडला आहे. आतापर्यंत पॉलिटेक्निकच्या तब्बल ९४ टक्के अधिक जागांवर प्रवेश झाले आहेत. दुसरीकडे नियाेजनाअभावी आयटीआयच्या चाैथ्या प्रवेश फेरीनंतरही अर्ध्याहून अधिक जागांवर प्रवेश झालेले नसल्याचे चित्र आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ४१० शैक्षणिक संस्थांमध्ये एक लाख १० हजारांहून अधिक प्रवेशासाठी जागा पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या प्रवेशात प्रामुख्याने सिव्‍हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या मुख्य शाखा असून, त्यांच्या इतर सर्व शाखा या मुख्य शाखेच्या अंतर्गत उपशाखा आहेत. या जागांवर आत्तापर्यंत चार फेऱ्यांपर्यंत एक लाख तीन हजार ४५९ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. हा मागील १० वर्षांतील सर्वोच्च आकडा असून, प्रवेशाची टक्केवारी तब्बल ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून ४ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाला मुदत देण्यात आली आहे.
दुसरीकडे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय ४१९ आणि खासगी संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या ५८८ अशा एकूण १,००७ आयटीआय असून, यात विविध शाखांच्या प्रवेशासाठी एक लाख ५२ हजार ६० प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांवर ८ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चाैथ्या फेरीनंतर केवळ ७१ हजार ४७९ जागांवर प्रवेश झाले असून, उर्वरित तब्बल अर्ध्याहून अधिक ८० हजार ५८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. आता या रिक्त जागांसाठी १२ ऑगस्टपासून विशेष फेरीचे आणि त्यानंतर आयटीआय स्तरावर संस्थात्मक फेरी आदींचे आयोजन केले जाणार आहे. एकूणच आयटीआयच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या असल्याने आयटीआयकडे कल कमी झाला की संचालनालयाकडून नियोजन नीट होऊ शकले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
--
मागील काही वर्षांतील प्रवेश
पदविका अभ्यासक्रम - २०२१-२२ - २०२२-२३ - २०२३-२४ - २०२४-२५
संस्थांची संख्या - ३६७ - ३६५ - ३८८ - ४००
प्रवेश झालेले विद्यार्थी ६९,७०५ - ८४,४५२ - ८६,४६५ - ९५,५११
टक्केवारी - ७० टक्के - ८५ टक्के - ८७ टक्के - ९० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com