मी निवडून येऊ नये म्हणून महायुतीतील नेत्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते - ना. भरत गोगावले
निवडणुकीत माझ्या पराभवासाठी अनेकांचे प्रयत्न
मंत्री भरत गोगावले यांची माहिती; शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा
माणगाव, ता. १४ (बातमीदार) ः माणगाव शहर हे श्रीवर्धन मतदारसंघात येते; तरीसुद्धा शिवसेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून माणगाव शहराची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. बलाढ्य शक्तीला नमवून आम्ही नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता आणली. प्रत्येक वर्षाला नगर पंचायतीला विकासकामांसाठी पैसे दिले. विधानसभा निवडणुकीत मी निवडून येऊ नये म्हणून महायुतीतील नेत्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते; तरीसुद्धा मी २६ हजार मतांनी निवडून आलो. त्यासाठी मी माणगावकरांचा ऋणी आहे, असे प्रतिपादन मंत्री भरत गोगावले यांनी केले.
माणगाव शहरातील गांधी मेमोरियल हॉल येथे बुधवारी (ता. १३) शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा पार पडला. माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्यासहित शेकडो कार्यकर्त्यांनी भरत गोगावले व आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या वेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रवेशकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मंत्री गोगावले म्हणाले, की गरिबांना फसवणारे, अनेक जमिनी व शासनाला लुटणाऱ्यांमधील आम्ही नाही आहोत. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे उरलेले काम लवकरच सुरू होईल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चार जागा आम्ही निवडून आणू, नाहीतर आम्ही तोंड दाखवणार नाही, असे काही जण बोलले आहेत. त्यांच्या तोंडाला काळे फासण्याची संधी आयती चालून येणार आहे. त्यांच्या तोंडाला काळे फासा म्हणजे ते परत कधी कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाहीत. तटकरेंनी पाठी-पुढे केले तर राजीव साबळे हे भाजप पक्षात प्रवेश करतील, असा टोला या वेळी मंत्री गोगावले यांनी लगावला. या वेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, डॉ. परेश उभारे, नितीन दसवते, मनोज पवार, चेतन गायकवाड, रणधीर कनोजे, महेंद्र दळवी, काशिराम पवार, संतोष मांजरे, कैलास पवार, सुमित काळे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
................
चौकट
राजीव साबळे यांनी वडिलांचे नाव धुळीस मिळवले
आमदार महेंद्र थोरवे यांनी राजीव साबळेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की राजीव साबळे म्हणजे कमर्शियल माणूस. १० कोटींचे मानधन संपले की ते दुसऱ्या पक्षात जातील. त्यांनी वडिलांचे नाव धुळीस मिळवले आहे. आता उलटी गिनती सुरू करा. राजीव साबळे यांचा हा चौथा पक्षप्रवेश आहे. तसेच ते आता औरंगजेबाच्या छावणीत जाऊन बसले असल्याची टीका या वेळी थोरवे यांनी केली.
.............