बीडीडीवासीयांचा तीन पिढ्यांचा वनवास संपला!

बीडीडीवासीयांचा तीन पिढ्यांचा वनवास संपला!

Published on

बीडीडीवासीयांचा तीन पिढ्यांचा वनवास संपला!
- चावी हाती पडताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू; सहा-सात दशके सोसलेल्या हालअपेष्टा संपल्याची भावना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : आधी सासू-सासरे, मग आम्ही नवरा-बायको आणि आता मुलगा आणि नातवंडे अशा आमच्या तीन-चार पिढ्या बीडीडी चाळीत गेल्या आहेत. १६० चौरस फुटांच्या घरात आम्ही कसेबसे दिवस काढले. उंबऱ्यातून आत जाताच संपणाऱ्या तोकड्या घरातच आम्ही घडलो. मुले मोठी केली, हालअपेष्टा सहन केल्या. पण आज चाळीतील आमचा वनवास संपला असून, आम्ही आता गगणचुंबी टाॅवरमध्ये जात असल्याचा आनंद असल्याच्या भावना बीडीडीवासीयांनी व्यक्त केल्या.
हक्काच्या घराची चावी हातात पडताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. दरम्यान, चाळीतून बिल्डिंगमध्ये जाणार असलो तरी चाळीतील माणुसकी कायम ठेवणार असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. शतकभरापूर्वी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने (बीडीडी) वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे उभारलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केली जात असून, त्याच्या पहिल्या टप्प्यात वरळी बीडीडीमधील ५५६ रहिवाशांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चावी वाटप करण्यात आले. या वेळी संबंधित बीडीडीवासीय अक्षरशः भावुक झाले होते. १६० चौरस फुटांच्या घरात आमच्या तीन-चार पिढ्या गेल्या. मात्र आज आम्हाला ४० मजली गगणचुंबी टाॅवरमध्ये हक्काचे घर मिळाल्याने आमचा वनवास संपला, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, बीडीडी चाळ पुनर्विकासाला सुरुवात झाली तरी रहिवासी चाळी रिकाम्या करायला तयार नव्हते. तेव्हा कृष्णाबाई जयराम काळे या आजीबाई सर्वप्रथम आपल्या कुटुंबासह संक्रमण शिबिरात राहायला गेल्या होत्या. त्यानंतर दोन महिन्यांनी इतर रहिवाशांनी घरे रिकामी केली होती. आज हक्काच्या घराची चावी मिळाल्याने आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सोमवारपासून सर्वांना चावी मिळणार
वरळी बीडीडीच्या जागेवर ५५६ घरे तयार झाली आहेत. आज चावीवाटपाच्या कार्यक्रमात १५ रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याहस्ते चावी आणि देकारपत्र देण्यात आले. उर्वरित रहिवाशांना सोमवार, १८ ऑगस्टपासून इमारतीच्या ठिकाणी चावी दिल्या जाणार आहेत.

७-८ दशकांचे वास्तव्य
चावी घेण्यासाठी आलेले रहिवासी गेल्या सात-आठ दशकांपासून बीडीडी चाळीत वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. अनेकांच्या वडिलांच्या, आईच्या नावावर खोली होती. त्याच्या पाश्चात ती खोली त्यांच्या मुलाच्या, मुलीच्या नावावर गेली. म्हणजे ज्यांचा जन्मच बीडीडीमध्ये झाला आणि सात-आठ दशके वास्तव्य असलेले ७५-८० वयाचे रहिवासी आपल्या घराची चावी घेण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या घराचे कुतुहूल दिसत होते.

माझी सासू आणि पती बीडीडीमध्ये राहायला होते. लग्नानंतर मीही त्यांच्यासोबत होते. गेली ६५ वर्षे मी त्या अरुंद खोलीत काढले आहेत. पण आता प्रशस्त घर मिळत आहे याचा आनंद आहे. आम्ही खस्ता खाल्ल्या पण आता मुलाला आणि नातवाला चांगले दिवस आलेत याचे समाधान आहे.
- फुलाबाई भोसले, लाभार्थी (चाळ क्र. ३१)

वरळी बीडीडीच्या ३१ नंबर चाळीत ५८ क्रमांकाची आमची खोली होती. आईच्या नावावर असलेली खोली मग माझ्या नावावर आली. आता माझेही वय होत आल्याने मुलांनाही येथेच दिवस काढावे लागतील असे वाटत होते. पण म्हाडाने केलेल्या कामामुळे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे आयुष्य काढलेली चाळ तुटली याचे दु:ख असले तरी मोठे घर मिळाल्याचा आनंद आहे.
- कृष्णाबाई काळे, लाभार्थी

आधी जेल म्हणून वापरलेल्या बीडीडी चाळीत आम्ही १९५० पासून वास्तव्यास आहे. आता थेट चाळातून गगणचुंबी टाॅवरच्या ४०व्या मजल्यावर राहायला जाणार आहे. त्याची चावीही आज मिळाली. मुलगा, नातवासह कुटुंब आनंदाने राहू. हा मोठा भाग्याचा क्षण आहे.
- विजय कासले, लाभार्थी (चाळ क्र. ११)

आमची पिढी बीडीडी चाळीतच गेली. त्यामुळे मुलांना तरी चांगले प्रशस्त घर मिळणार की त्यांनाही याच चाळीत कसेबसे दिवस काढावे लागणार, असे नेहमी वाटायचे. पण गेल्या चार वर्षांत बीडीडीचे वेगाने काम झाल्यानेच आमचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे.
- शुभांगी गुरव, लाभार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com