थोडक्यात नवी मुंबई
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
जुईनगर, ता. १४ (बातमीदार) : बेलापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणांना वेगळी दिशा देणारी घडामोड घडली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेसचे नवी मुंबई उपजिल्हाध्यक्ष नवनाथ चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष खंबाळकर आणि भाजप युवा पदाधिकारी राजेश भोर हे या प्रवेशाचे प्रमुख चेहरे होते. बेलापूर, नेरूळ आणि सानपाडा परिसरातील सक्रिय कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची ताकद वाढवणारी या हालचाली मानल्या जात आहेत. पक्षप्रवेशानंतर राजेश भोर यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर काम करण्याची अपेक्षित संधी आपल्या मूळ पक्षात मिळत नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत आलो आहोत. कार्यक्रमास माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख एम. के. मढवी, प्रकाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
..................
बेलापूरमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन शिबिराचे आयोजन
नेरूळ (बातमीदार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर-नेरूळ शाखेतर्फे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त, २४ ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात झालेल्या त्यांच्या हत्येनंतर, दरवर्षी ज्या विचारांची मशाल त्यांनी पेटवली, ती जनमानसात पोहोचवण्याचा संकल्प या शिबिरातून घेतला जातो. हे शिबिर कॉम्रेड बी. टी. रणदिवे ग्रंथालय, सेक्टर २९, आग्रोळी, सीबीडी बेलापूर येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान होणार आहे. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारी समिती सदस्य ॲड. मुक्ता दाभोलकर (मुंबई), अण्णा कडलास्कर (पालघर), डॉ. दुष्यंत भादलीकर (डोंबिवली), तसेच कार्यकर्ते राजीव देशपांडे आणि रमेश साळुंखे मार्गदर्शन करणार आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, बुवाबाजी उघडकीस आणणारी प्रात्यक्षिके, मानसिक आजार आणि अंधश्रद्धा, तसेच जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती हे शिबिरातील प्रमुख विषय असतील. शिबिर विनामूल्य असून, इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी राजीव देशपांडे (९१३६१०९८४५), रमेश साळुंखे (९२२४३४०७२०) किंवा विजय खरात (९७५७२४९४८६) यांच्याशी संपर्क साधावा.
..................
राख्या, शुभेच्छा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कृतज्ञतेचा संदेश
जुईनगर (बातमीदार) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने सानपाडा व जुईनगर येथील भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या आणि हस्तलिखित शुभेच्छा पत्रे पाठवून कृतज्ञतेचा संदेश दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार, नवी मुंबईतील वाशीगाव, सानपाडा-पाम बीच व जुईनगर या तीन प्रभागांतील माजी नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत आणि रुपाली भगत यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या लिफाफ्यांमध्ये भगिनींनी स्वहस्ते लिहिलेली पत्रे असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा उल्लेख आहे. पंतप्रधान मातृवंदना योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, जलजीवन मिशन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मोफत व्यावसायिक शिक्षण, नमो ड्रोन योजना, लखपती दीदी योजना, अन्नपूर्णा योजना, सुकन्या समृद्धी योजना, लेक लाडकी योजना, बेबी केअर किट योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आदी उपक्रमांचा लाभ घेतलेल्या महिलांनी आपले अनुभव पत्रातून मांडले. या अभिनव उपक्रमातून भगिनींनी सरकारबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना रक्षाबंधनाचा सण सामाजिक ऐक्य आणि विकासाचा संदेश देणारा ठरवला आहे.
.............
ओरिएंटल कॉलेजमध्ये राष्ट्रीय ग्रंथपालदिन साजरा
तुर्भे (बातमीदार) : सानपाडा येथील ओरिएंटल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये राष्ट्रीय ग्रंथपालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालय शास्त्राचे पितामह डॉ. शियाली रामामृत (एस. आर.) रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यांनी आयुष्यभर ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली ठेवण्याचा विचार मांडला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता नाथ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले. पुस्तकासारखा दुसरा गुरू नाही. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी शिक्षणासोबतच निरंतर वाचन आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ग्रंथपाल सलीम धनसे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाभिमुख करण्यासाठी नवे प्रयोग राबविण्याची गरज व्यक्त केली. या दिवशी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध विभागांची माहिती देण्यात आली आणि वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी विविध उपक्रम जाहीर करण्यात आले.
....................
सानपाडा येथे शनिवारी भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष
नेरूळ (बातमीदार) ः नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उरण आणि पनवेल परिसरातील गोविंदा पथकांचे आकर्षण ठरणारा सानपाडा येथील दहीहंडी सोहळा यंदाही भव्य स्वरूपात पार पडणार आहे. सानपाडा सेक्टर-८ मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर, भाजप सानपाडा विभाग व साईभक्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले हे गेल्या पाच वर्षांपासून हा सोहळा आयोजित करत आहेत. मागील वर्षीच्या दहीहंडीत १४० हून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यंदा ५,५५,५५५ रुपयांची रोख बक्षिसे आणि साहित्य स्वरूपातील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाला भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांच्यासह पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित राहतील. नवी मुंबईत लाखो रुपयांच्या बक्षिसांसह होणाऱ्या या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. पांडुरंग आमले यांनी नवी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि पारंपरिक खेळाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी कुटुंबासह या सोहळ्यास उपस्थित राहावे.
..........
वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपालदिन साजरा
उरण, ता. १४ (वार्ताहर) ः भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपालदिन साजरा करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर ए. एस. सी. कॉलेज, फुंडे येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. उद्घाटन उद्योजक लायन मिलिंद पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी त्यांचे स्वागत गुलाब पुष्प आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या बुकमार्कद्वारे केले. मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तर डॉ. ठक्कर यांनी वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रा. संतोष देसाई, प्रा. तन्वी कोळी, ग्रंथपाल सुप्रिया नवले, तसेच सहाय्यक कमल बंगारे आणि नर्मदा खरपडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. दिवसभर विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
.........
उरणच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला बढती
उरण, ता. १४ (वार्ताहर) ः वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांची सहाय्यक पोलिस आयुक्त, कुलाबा (मुंबई) पदावर बदली झाली आहे. उरण पोलिस ठाण्यात त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच कायदा व सुव्यवस्था सुधारण्यात यश मिळवले. नागरिकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करताना विविध समस्यांवर तत्पर तोडगा काढल्यामुळे ते लोकप्रिय झाले. त्यांच्या बदलीच्या बातमीने उरणमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी पोलिस ठाण्यात हजर राहून त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात मिसाळ यांच्या डोळ्यांत आणि उपस्थितांच्या चेहऱ्यांवरही भावनिकता झळकत होती. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देताना, उरणकरांनी त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.