नवी मुंबईतील मासेमारीवर गंडातर

नवी मुंबईतील मासेमारीवर गंडातर

Published on

नवी मुंबईतील मासेमारीवर गंडांतर
प्रदूषण, नियमबाह्य मासेमारीमुळे मच्छीमार संकटात
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : एकेकाळी मासेमारी आणि शेती हे आगरी–कोळी समाजाचे प्रमुख व्यवसाय होते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे शेती इतिहासजमा झाली, तर मासेमारी व्यवसायावरही विविध संकटांचे सावट आले आहे. वाढते प्रदूषण, कांदळवनांवर होणारा जैविक कचऱ्याचा मारा, आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी तसेच नियमबाह्य मासेमारी यामुळे खाड्यांतील मत्स्य प्रजातींची संख्या झपाट्याने घटली आहे. खाऱ्या पाण्यातील मासेमारी धोक्यात आल्याने स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा आली आहे.
शहरातील रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी थेट खाड्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे पूर्वी संपन्न असलेल्या मत्स्यसंपत्तीचा ऱ्हास झाला आहे. १९८०–९०च्या दशकाच्या तुलनेत आज मत्स्य उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. दिवाळे कोळीवाड्यातील तब्बल ९० टक्के कुटुंबांचा, तर करावे, सारसोळे, वाशी, दिवा व ऐरोली गावांतील ४० ते ५० टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच अवलंबून आहे. या कुटुंबांना ना सिडकोकडून भरपाई मिळाली, ना एमआयडीसीकडून. त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. दिवाळे ते ऐरोली किनारपट्टी भागातील कांदळवने ही माशांची नैसर्गिक प्रजननस्थळे आहेत. मात्र प्रदूषण, तेलतवंग, औद्योगिक सांडपाणी आणि वाहून आलेल्या कचऱ्यामुळे ही संवेदनशील ठिकाणे धोक्यात आली आहेत. परिणामी अनेक मत्स्य प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कांदळवने केवळ मासे व खेकडे यांचे आश्रयस्थान नसून हवामान बदलाशी लढण्यासाठीही महत्त्वाची आहेत. ही वनराई मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेत असल्याने ‘कार्बन सिंक’ म्हणून कार्य करते.
.................
मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट
लहान होड्यांमधून खाडीत मासेमारी करणारे स्थानिक मच्छीमार आज उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पूर्वी भरतीदरम्यान किनाऱ्यावर जाळे टाकल्यावर बरेच मासे मिळत असत, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. चिवणी, कोळंबी, वाकटी, टोळ यांसारख्या प्रजातींचा लोप झाल्याने खाडीतील मासेमारी जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे कोळी बांधवांना खोल समुद्र गाठण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
...............
रासायनिक पाण्याचा घातक परिणाम
एमआयडीसीतील कारखान्यांतून विशेषतः पावसाळ्यात रसायनयुक्त पाणी खाड्यांत सोडले जाते. त्यामुळे बेलापूर व ऐरोली खाडीत मासे मृतावस्थेत आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरीही हा प्रकार सुरूच असून, स्थानिक मच्छीमारांचे जीवन धोक्यात आले आहे.
...............
आकडेवारी - लहान मोठ्या होड्या
दिवाळे कोळीवाडा : ४९०
करावे : ५५
सारसोळे : १५०
वाशी गाव : ३५०
दिवा : ३००
ऐरोली : २००
..............
मच्छीमारांचा आवाज
१ ऑगस्टपासून यांत्रिक मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. शासन मान्यतेनुसार नौका समुद्रात गेल्या असल्या तरी अजून वादळी परिस्थितीमुळे हंगामाची खरी सुरुवात होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मासेमारीवर इतके गंडातर आली आहे, की आमच्या उपजीविकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे दिवाळे कोळीवाड्यातील मच्‍छीमार किशोर कोळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com