दहीहंडीआधी राजकीय शिमगा

दहीहंडीआधी राजकीय शिमगा

Published on

दहीहंडीआधी राजकीय शिमगा
परवानगी नाकारण्यासाठी नेत्यांचा दबाव

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकीय पक्षांतर्फे नवी मुंबईत दहीहंड्यांचे जोरदार आयोजन केले जात आहे; मात्र आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या दहीहंडी आयोजनाला परवानगी मिळू नये, याकरिता राजकीय नेत्यांकडून पोलिस आणि महापालिका प्रशासनाचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.
ऐरोलीमध्ये शिवसेनेतर्फे उपनेते विजय चौगुले यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडी आयोजनाला ऐनवेळी पोलिसांनी परवानगी देताना नन्नाचा पाढा लावला, तर नेरूळ येथे ठाकरे गटातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडीला परवानगी देण्यास महापालिकेने सपशेल नकार दिला; परंतु दोन दिवस आधीच महापालिकेने नेरूळमध्ये मनसेच्या चोर दहीहंडीला परवानगी दिल्यामुळे महापालिका दुजाभाव करीत असल्याचा आरोप दहीहंडी मंडळांकडून करण्यात येत आहे. नेरूळ येथे शिवसेनेचे ठाकरे गटप्रणित संघर्ष युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडीला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. या भागातील स्थानिक माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांनी परवानगी देऊ नये, असे पत्र महापालिकेला दिले आहे. दहीहंडी आयोजनामुळे रस्त्यावर वाहनांना ये-जा करण्यास जागा राहत नाही. पथकांची वाहने पदपथावर उभी असतात, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. ऐरोली येथे गेली १५ वर्षे आयोजित केल्या जात असणाऱ्या, शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांच्या दहीहंडी आयोजनात बरेच अडथळे आले. महापालिकेने दिलेली परवानगी रद्द करून दहीहंडीकरिता बांधलेले स्टेज तोडण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. पोलिसांनीही चौगुले यांना परवानगी नाकारली. अखेर चौगुले यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणे केल्यानंतर दुपारपर्यंत स्टेज तोडायला येणारे पथक आलेच नाही; परंतु परवानगी घेण्यात बरीच दमछाक झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
...
गेले १५ वर्षे शिवसेनेतर्फे ऐरोली सेक्टर १५ येथे दहीहंडीचे आयोजन केले जाते. आयोजनावेळी वाहनांना आणि नागरिकांना त्रास होऊ नये, याची पूर्ण खबरदारी मंडळातर्फे घेतली जाते. तरीदेखील माझ्यावर राजकीय सूड उगवण्यासाठी युतीमधील एक नेता पोलिस आणि महापालिकेवर दबाव टाकून माझ्या आयोजनावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे.
- विजय चौगुले, नवी मुंबई उपनेते, शिवसेना, शिंदे गट
...
नेरूळ सेक्टर दोन येथे सूरज अपार्टमेंटजवळील रस्त्यावर संघर्ष युवा प्रतिष्ठानतर्फे गेली तीन वर्षे दहीहंडीचे आयोजन केले जाते. आमच्याकडे जवळच्या सर्वच रहिवासी सोसायटींचे ना हरकत दाखले असतानाही केवळ राजकीय दबावापोटी महापालिका परवानगी देत नाही. तरीसुद्धा आम्ही दहीहंडीचे आयोजन करणारच.
- सावन थोरात, ठाकरे गट शिवसेना विभागप्रमुख
...
दहीहंडी मंडळांना परवानगी नाकारल्याचा प्रकार मला माहिती नाही. परवानगी देण्याबाबतची प्रक्रिया माझ्यापर्यंत येत नाही. विभाग अधिकारी कार्यालय स्तराहून ही प्रक्रिया पार पाडली जाते. एकाच ठिकाणी किती सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी आयोजनासाठी परवानगी मागावी, यालाही काही मर्यादा असतात. सरकारी नियम पाळून परवानगी देताना विभाग अधिकाऱ्यांवरही बंधने असतात.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com