मध्य रेल्वेची साडेसाती सुटेना!
मध्य रेल्वेची साडेसाती सुटेना!
बदलापूर स्थानकात प्रवाशांचा संताप; स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव
बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : सलग दुसऱ्या दिवशी लोकल गाड्या अर्धा तास उशिराने धावत असल्याने त्रासलेल्या बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांनी थेट स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घालत तीव्र नाराजी व्यक्त केली. दररोज होणारा उशीर, लेटमार्क, वरिष्ठांकडून बोलणी आणि नोकरीवर गदा येण्याच्या भीतीमुळे अखेर बदलापूरकरांचा संयम सुटला. गेल्या दोन दिवसांत सकाळी ८.२५ च्या कर्जत-मुंबई लोकलच्या वेळापत्रकात गडबड झाली. बुधवारी (ता. १३) वांगणी ते बदलापूरदरम्यान रुळांवर मृतदेह आढळल्यामुळे गाडी अर्धा तास उशिराने आली. गुरुवारी ( ता. १४) पुन्हा तीच गाडी ९ वाजता आली, त्यामुळे प्रवाशांचा संयम सुटला.
संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. रोज कामाला जायला उशीर होतो, कामावर जाताना रोज लेट मार्क लागतो, वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागतात, नोकरी जाईल याची भीती सतावत असते, अशा सगळ्या परिस्थितीत मध्य रेल्वेकडून होत असलेली रोजची दिरंगाई आम्ही का सहन करायची, असा सवाल बदलापूरचे रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत. लोकल उशिरा धावत आहेत, निदान याबाबत प्रवाशांना उद्घोषणा करून सूचित करा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली. या वेळी लोकल उशिरा आहेत. यासंदर्भात उद्घोषणा केल्या आहेत, असे स्टेशन मास्तरांनी सांगितले; मात्र या उद्घोषणा रेल्वे प्रवाशांना ऐकूच गेल्या नाहीत, असे रेल्वे प्रवाशांनी सांगितले. उद्घोषणा ऐकू येत नाहीत याबाबत आरपीएफ कर्मचाऱ्यांनीसुद्धा दुजोरा दिला. त्यामुळे उद्घोषणा ऐकूच येत नाहीत हे समोर आले. आरपीएफ कर्मचाऱ्यांनीही उद्घोषणा नीट ऐकू येत नसल्याचं मान्य केलं.
प्रवाशांचा इशारा
रेल्वे प्रशासनाने जर वेळेत सुधारणा केल्या नाहीत, तर पुढील आठवड्यात ''रेल रोको'' आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा दिला आहे.
रोज कामावर उशीर होत असल्याने पगार कापला जातो. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निदान वेळेवर लोकल सोडा.
- मनाली राणे, महिला प्रवासी
रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण बदलापूरच्या लोकल प्रवासाला साजेशी ठरते. बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना पुरेशा रेल्वे फेऱ्या नाहीत. त्यात ज्या लोकल फेऱ्या आहेत, त्या वेळेवर कधीच नसतात. यासंदर्भात उद्घोषणा केल्या जात नाहीत, बदलापूर फलाट क्रमांक तीनवर ध्वनी प्रक्षेपक यंत्र मध्यभागी बसवलेले आहेत. त्यामुळे फलाटाच्या दोन्ही टोकाकडील इतर प्रवाशांना या उद्घोषणा ऐकूच जात नाहीत. त्यामुळे कुठेतरी रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात तातडीने लक्ष घालून समस्या सोडवाव्यात. अन्यथा बदलापूरकरांचा संताप रेल्वे रुळावर उतरून, रेल रोको करून व्यक्त केला जाईल.
- दिलीप पाटील, प्रवासी
प्रवाशांच्या मागण्या :
लोकल वेळेत धावाव्यात.
उशिराबाबत स्पष्ट व श्रवणीय उद्घोषणा व्हाव्यात.
स्टेशनवर ठरावीक अंतरावर ध्वनी प्रक्षेपक बसवावेत.
फलाट क्रमांक ३ वर फक्त मध्यभागी स्पीकर असल्यामुळे टोकाला काही ऐकू येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.