किनारा मार्गावर वेगमर्यादा पाळा!
किनारा मार्गावर वेगमर्यादा पाळा!
मुख्यमंत्री फडणवीस; वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : शहर अधिक गतिमान होण्यासाठी मुंबई महापालिका पायाभूत सुविधांचा विस्तार करीत आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड दक्षिण) महत्त्वपूर्ण ठरत आहे. हा मार्ग शुक्रवारी मध्यरात्रीपासून २४ तास खुला हाेणार आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
किनारा मार्ग (दक्षिण) प्रकल्पावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतून हा सोहळा पार पडला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, पालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी आदी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘किनारा मार्गावरील विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्गांचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. नागरिकांना समुद्रकिनारी चालण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून विहार क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. प्रशस्त पदपथ, हिरवळ, सायकल ट्रॅक तसेच दिव्यांगांसाठी व्हिलचेअर इत्यादी सुविधांमुळे किनारी रस्ता प्रकल्पाच्या सौंदर्यात भर पडली आहे.’
नागरिकांसाठी विरंगुळा तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी पालिकेने विहार क्षेत्रावर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सायकल ट्रॅक, विसाव्यासाठी आसनव्यवस्थाही दिली आहे. उपलब्ध जागेनुसार विविध फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. भुयारी पादचारी मार्गावर दिव्यांगांसाठी स्वतंत्र उतार मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सायकलस्वार व दिव्यांग येथे सहज प्रवेश करू शकतात. मरीन ड्राइव्हबरोबरच वरळी येथेही विहार क्षेत्र उपलब्ध झाले असून, मुंबईकरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
जीव धाेक्यात घालू नये!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की सुंदर असा किनारी रस्ता २४ तास सुरू केल्यावर वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे. मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नयेत. आपला व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिस कार्यवाही करतील. किनारी मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित वाहने चालवावीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
-----
मुंबईत रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. सुशोभीकरण, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप यावे, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
---
मुंबई हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. समाजातील प्रत्येक घटक मुंबईच्या विकासासाठी घाम गाळत आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबईचा चेहरामोहरा बदलत आहे. पालिका विकासाभिमुख प्रकल्प राबवत असून कामे अधिक दर्जेदार व्हावीत, यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.