विसर्जन मिरवणुकीची मजा होईल कान, डोळ्यांना सजा
विसर्जन मिरवणुकीची मजा; कान, डोळ्यांना होईल सजा
काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन, आवाजापासून लहान मुलांना दूर ठेवणेच चांगले.
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा.
पनवेल, ता. १४ (बातमीदार) : पनवेलमध्ये आगमन व विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रणालीचा दणदणाट आणि प्रखर प्रकाशझोत असलेले लेझर यामुळे कान व डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो. दरवर्षी विसर्जन मिरवणुका झाल्यानंतर कान व डोळ्यांना इजा झाल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. विसर्जन मिरवणुकीत कानाला व डोळ्यांना इजा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन कान, नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
ढोल-ताशांचा गजर, ढोलाचा हृदयाचा ठोका चुकविणारा आवाज यांच्या संपर्कात बराच काळ राहिल्यास कानाचा पडदा फाटून प्रसंगी ऐकू येणे बंद होण्याची शक्यता असते. लहान मुलांनाही विसर्जन मिरवणुकीत सोबत नेले जाते. अनेकदा ही मुले आकर्षणापोटी स्पीकरच्या भिंतीजवळच जाऊन थांबतात. तसेच ढोल-ताशा पथकांच्या सान्निध्यात राहिल्यानेही कानाला इजा पोहोचते. गर्भवती महिलांनीही मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपले कान ८० डेसिबल आवाज सहन करू शकतात. सामान्य माणसाचे कान हे ७५ ते ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतात. त्याच्यापुढे आवाजाची पातळी गेली की त्याचा थेट कानांवर परिणाम होतो.
मिरवणुकीनंतर कानात विशिष्ट आवाज येत असल्यास, चक्कर येऊ लागल्यास, हृदयात धडधड वाढल्यास त्वरित नाक, कान, घसा तज्ज्ञांना दाखवले पाहिजे; जेणेकरून त्वरित निदान होऊन कायमस्वरूपी इजा टाळता येईल. प्रखर प्रकाशझोताच्या लेझरमुळे डोळ्यांना दुखापत होते. थोड्या वेळासाठी नजर अंधुक होते. २५ ते ३० टक्के लोकांमध्ये कायमस्वरूपी नजर अंधुक होते. काही वेळा डोळ्यांचा पडदा जळू शकतो. मोतीबिंदू होऊ शकतो. बुबुळावर जखम होऊ शकते. अशावेळी लेझर जेथे असतील त्यापासून लांब राहणे पसंत करावे. थेट डोळ्यांनी लेझर पाहणे टाळले पाहिजे, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ देतात.
ही घ्या काळजी...
लहान मुलांना कानटोपी घाला. कानात हवेचा बूच वापरा. सतत मिरवणुकीत थांबू नका. दर अर्ध्या, दोन तासांनी १०-२० फूट लांब गेले पाहिजे. भरपूर पाणी प्या, ढोल-ताशा वादकांनीही कानात हवेचा बूच वापरा. दुचाकीवरून जाताना हेल्मेट वापरा. व्हायब्रेशन होऊ नये, यासाठी जाड चप्पल, बूट वापरा.
मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात वाद्ये, गाणी वाजवल्यामुळे हृदयावर ताण येतो. तो टाळण्यासाठी कानात हवेचा बूच घातल्यास आवाजाची तीव्रता कमी होते. कानाला त्रास होत असल्यास तातडीने तज्ज्ञांना दाखवले पाहिजे.
- डाॅ. सुनील सस्ते
लेझर थेट डोळ्यांवर येतील, अशा ठिकाणी थांबू नये. लेझरकडे पाहणे टाळावे; तरीही डोळे चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांमध्ये पाणी येणे अशी लक्षणे जाणवल्यास नेत्ररोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.
- डाॅ. रजत जाधव,
नेत्ररोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.