भर पावसातही गोविंदा पथकांचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १६ : जिल्ह्यातील आठही तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदाने वाजत-गाजत साजरा करण्यात आला. संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. गोविंदा पथकांनी पारंपरिक वाद्यासह बेंजोच्या तालावर ठेका धरत सर्वत्र उत्साहात दहीहंड्या फोडल्या. पुरुषांसह महिला पथकांनीही दहीहंडीसाठी सलामी दिल्या. पाऊस सुरू असतानाही भर पावसात गोविंदा पथकांनी दहीहंडींना सलामी देऊन आपला उत्साह कायम ठेवला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंड्यांना मोठा राजकीय रंग पालघर जिल्ह्यात दिसून आला. विविध राजकीय पक्षांमार्फत लाखो रुपयांची बक्षिसे गोविंदा पथकांसाठी ठेवली होती. अनेक ठिकाणी राजकीय दहीहंड्यांना इव्हेंटचे स्वरूप आले होते. लाखोंचे इनाम उधळून मतदार राजाला आपल्याकडे करण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षांनी यादरम्यान केल्याचे दिसले.
पालघर जिल्ह्यात गोकुळाष्टमीनिमित्त नऊ मिरवणुका काढण्यात आल्या. ५११ सार्वजनिक, तर ६१० खाजगी दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या होत्या. पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या पालघर, मनोर, सफाळे, केळवा, सातपाटी, बोईसर, तारापूर, वानगाव, डहाणू, तलासरी, घोलवड, जव्हार, कासा, विक्रमगड, वाडा, मोखाडा आदी ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आले होते. वसई-विरारमध्येही मोठ्या प्रमाणात दहीहंडी ठिकठिकाणी आयोजित करण्यात आली होती. महापालिका निवडणुका लक्षात घेत यंदा वसई-विरार शहरात दहीहंडीला मोठ्या प्रमाणात पेव फुटले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून गोविंदा पथकांनी सराव करून दहीहंडीला सलामी देण्याची तयारी केली होती. त्यानुसार शनिवारी (ता. १६) दहीहंडी पथकांनी जिल्हाभर फिरत सलामी देत मोठी इनाम जिंकले, तर जिल्ह्यातील काही भागांमध्ये पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी मोठा पोलिस बंदोबस्त जिल्हाभर ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.