पावसामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ ठप्प

पावसामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ ठप्प

Published on

‘मुसळधारे’मुळे लोकलची रखडपट्टी
२८ फेऱ्या रद्द; १५० पेक्षा अधिक गाड्यांना विलंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुसळधार पावसाने शनिवारी (ता. १६) सकाळी मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. चुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर, टिळकनगरसह मानखुर्द, गोवंडी या स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य व हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळित झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळीच मुख्य मार्गांवरील १३ लोकल फेऱ्या आणि हार्बर मार्गावरील १५ लोकल फेऱ्या अशा एकूण २८ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. दिवसभरात हा आकडा ३५वर गेला. त्याशिवाय तब्बल १५० हून अधिक लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. परिणामी प्रवाशांचे हाल झाले.
मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी (ता. १५) रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी सकाळी वाढला. शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले. रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेसाठी गाड्यांचा वेग मर्यादित ठेवला. आधीच कमी दृश्‍यमानता, आणि त्यात लोकल संथ झाल्याने एकामागून एक गाड्या थांबून राहिल्या. सीवूड्स ते सीएसएमटी हा प्रवास तासाभरापेक्षा जास्त वेळेत पूर्ण करावा लागला. मध्‍य रेल्वेवरील लोकल ३० ते ४० मिनिटे तर हार्बर मार्गावरील गाड्या तासाभराहून अधिक उशिराने धावत होत्या. लोकल विस्कळित झाल्याने प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली. दरम्यान, ‘काही ठिकाणी रुळांवर पाणी आल्याने प्रवासी सुरक्षा लक्षात घेऊन लोकलचा वेग कमी करावा लागला.  त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला,’ असे स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आले.
---
गोविंदांचे हाल
 दहीहंडी उत्सवासाठी उपनगरांतून मोठ्या प्रमाणात गोविंदा मुंबईकडे निघाले होते. मात्र लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने अनेक पथकांचा प्रवास किचकट झाला. वेळेत मंडळांच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. काही ठिकाणी गोविंदांना लोकलमध्येच दीर्घकाळ थांबावे लागले. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सकाळपासून निघालेल्या नागरिकांनाही ताटकळत प्रवास करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com