एकनाथ शिंदेना कमावलेले टिकवता आलं पाहिजे

एकनाथ शिंदेना कमावलेले टिकवता आलं पाहिजे

Published on

एकनाथ शिंदेंना कमावलेले टिकवता आले पाहिजे!
पालकमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन; टिश्यू कल्चर लॅबची उभारणी करणार
मनोर, ता. १६ (बातमीदार) : नशिबाने प्रत्येकाला लॉटरी लागत नाही, परंतु एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे, असे सांगत कमावलेले टिकवता आले पाहिजे, असा सल्ला गणेश नाईक यांनी दिला. तसेच किती कमावलं, कसं कमवलं; पण कसं टिकवलं याकडे जनसामान्यांची नजर असते, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
शुक्रवारी सकाळी पालघर तालुक्यातील महामार्गालगतच्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी पालघर जिल्ह्यात टिश्‍यू कल्चर लॅब उभारण्याची घोषणा केली. पालघर जिल्ह्यात दोन कोटी झाडांची लागवड केली जाणार असल्याचे सांगत येत्या पाच वर्षांत राज्यभरात अडीचशे कोटी रोपं लागणार आहेत, असे सांगत जलद गतीने रोपनिर्मितीसाठी राज्यात पाच टिशू कल्चर लॅबची उभारणी केली जाणार असल्याची माहिती दिली. टिश्‍यू लॅबसाठी प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले, की पालघर जिल्ह्याची निर्मिती केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात झाली पाहिजे, यासाठी माझा आग्रह होता. जिल्हा मुख्यालयाच्या देखण्या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवांमध्ये गतीने विकसित होत आहेत. या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, दुर्वेश ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश कडव, माजी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी तन्वीर शेख, शिवसेनेचे वसंत चव्हाण, समाजसेवक दामोदर पाटील तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

चौकट
निधीअभावी विकासकामे थांबणार नाहीत
पालघर जिल्ह्यातील डोंगर हिरवेगार करणे, रस्त्यांच्या कडेला विविध रंगांची व सुगंधी झाडे लावणे आणि २०० हेक्टर फॉरेस्ट जमीन सौंदर्यीकरणासाठी वापरण्याचे नियोजन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. तसेच जिल्ह्यातील कोणतीही विकासकामे निधीअभावी थांबणार नाहीत, असे आश्वासन पालकमंत्री नाईक यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com