बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात

बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात

Published on

बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात
वस्त्राकंलाकारांची मागणी वाढली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यातच गणेशमूर्तिकारांनी आता बाप्पाच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली आहे. मोठमोठे गणपती आधीच मंडळांनी नेण्यास सुरुवात केली आहे. शेवटचा रविवार असल्याने जास्तीत जास्त बाप्पा रविवारी आपापल्या स्थानी स्थानापन्न होतील. याच आशेने मुंबईच्या अनेक गणेशमूर्तिकारांच्या गणरायाच्या रूपाला अधिक मनमोहक करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
साधारण मूर्तींना विविध प्रकारच्या कापडी, वेलवेट, जाळीदार कपड्यांनी पितांबर आणि शेला लावला जात आहे. भक्तांच्या मागणीनुसार गणरायाच्या अंगावर मोती, रंगीत खड्यांची सजावट करण्यास मूर्तिकारांनी कंबर कसली आहे. बाप्पा कलेचा देव असे म्हटले जाते. त्यामुळे आपली कला बाप्पाच्या रूपात मांडता यावी, यासाठी मुंबई परिसरातील प्लास्टिक ऑफ पॅरिस आणि शाडू मातीचे बाप्पा बनवणारे कलाकार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. यंदा बाप्पांची मागणी वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बुकिंग आणि गणेशमूर्ती ने-आण करण्याची लगबग पाहायला मिळते.
मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत बहुतांश सार्वजनिक मंडळांनी रविवार, सुट्ट्यांचा मुहूर्त पाहून गणरायाचे ढोलताशाच्या गजरात स्वागत केले असले तरी घरगुती गणपती आणि लहान सार्वजनिक मंडळांकडून २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. आपला घरचा गणपती असो किंवा मंडळांचा बाप्पा असो तो अधिक सुंदर, आकर्षक दिसावा, यासाठी पितांबर (धोतर), विविध रंगी मोती, खडे, टिळे यांबाबत मूर्तिकारांकडे मागणी वाढली आहे.

काठापदराच्या पितांबराला पसंती
काळानुरूप गणेशोत्सवाचे रूप जसे बदलत चालले आहे, त्याचप्रमाणे गणरायाच्या विविध रूपांतील, बैठकीतील मूर्तींचे ट्रेंडदेखील बदलले आहेत. अशातच शाडू, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीमध्ये अधिक जिवंतपणा आणण्यासाठी मूर्तिकारांकडून मूर्तींना कापडी वस्त्रांचे पितांबर, शेला, फेटा यांचा साज चढवला जातो. मात्र यातही वेगवेगळ्या प्रकारच्या, कपड्यांच्या, काठापदराच्या पितांबर शैलीने सजावट केलेल्या मूर्तींना भक्तांकडून सर्वाधिक मागणी आहे.

भाविकांच्या मागणीप्रमाणे मूर्तीला अधिक जिवंतपणा देणे, हे भक्तांप्रमाणे आमच्यासाठीदेखील कौशल्याचे आणि आनंद देणारे आहे. गणेशभक्तांच्या पसंतीनुसार मूर्तीवर कलाकुसर केली जात आहे.
- चव्हाण सानप ब्रदर्स, विक्रेते, नवी मुंबई,

भक्तांना काय हवे त्यानुसार आम्ही मूर्ती अधिक शोभिवंत करतो. सध्या चौरंग मूर्ती, टिटवाळा मूर्ती, दगडूशेठ मूर्ती, विठ्ठलरूपी मूर्ती, सिंहासनाधीश्वर मूर्तींना मागणी अधिक आहे.
- सुनील पाटील, मूर्तिकार, मुंबई

लालबागमधील मूर्तींना पसंती
लालबाग परिसरातील यावर्षी गणेशमूर्तीचे वेगवेगळे कारखाने बांधण्यात आले आहेत. कोल्हापूर, पुणे, सातारा येथूनही बाप्पांच्या मूर्ती इथे ठेवण्यात आल्या आहेत. यापैकीच एक मूर्तिकार रूपेश नार्वेकर यांच्या कलाकृतीला नागरिकांची पसंती मिळत आहे. दिवसभरात किमान २० ते २५ मूर्तींसाठी विचारणा होत असून, बाप्पाच्या सोंडेवर बारीक मोती, मणी, मुकुटावर मोरपंख, गळ्यातल्या हारावर मोती अशा कलाकृती करताना इथले कामगार दिसत आहेत. हाताला बाजूबंध, गरजेनुसार, शेला, पासोटा, पितांबर अशी कलाकृती आणि वेगळेपण जपण्याचा प्रयत्न यंदा केला गेला आहे.

गर्दीचा रविवार
अखेरचा रविवार असल्याने जेवढी गर्दी बाप्पाच्या आगमनासाठी आहे तेवढीच ती खरेदीसाठीदेखील आहे. गावी जाणारे चाकरमानी बाप्पाच्या खरेदीसाठी दादर, भुलेश्वर मार्केट, क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबईतील इतर मोठ्या बाजारांमध्ये दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com