शहाडमध्ये संस्कृतीची दहीहंडी
शहाडमध्ये संस्कृतीची दहीहंडी
आई गावदेवी पथकाची सहा थरांची मानवी रचना
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : शहाड फाटक परिसर शनिवारी दुपारी दहीहंडीच्या जल्लोषाने दणाणून गेला. ताल-ढोलांच्या गजरात आणि जयघोषांच्या आरोळ्यांमध्ये भुल्लर महाराज फाउंडेशनतर्फे दहीहंडी सोहळा पार पडला. या सोहळ्यात आई गावदेवी गोविंदा पथकाने तब्बल सहा थरांची मानवी रचना करून मटकी फोडत ऐतिहासिक कामगिरी केली. या क्षणाने संपूर्ण शहाड शहर उत्साहात न्हाऊन निघाले.
ढोल-ताशांच्या तालावर, ‘गोविंदा आला रे’च्या गजरात आणि जय महाराष्ट्रच्या आरोळ्यांत सहा थरांची दिमाखदार रचना उभारून गावदेवी पथकाने दहीहंडी फोडली. या विक्रमी कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज उपस्थित होते. त्यांनी विजेत्या गोविंदा पथकाचे अभिनंदन करत रोख रक्कम व पारितोषिक प्रदान केले. या वेळी युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शिस्तबद्ध वातावरण, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे सोहळ्याला अधिक आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. पारंपरिक वेशभूषा, देशभक्तीपर गीत आणि गोविंदा पथकांचा उत्साह यामुळे ‘संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी’ हा घोष खऱ्या अर्थाने सार्थ ठरला.
अंबरनाथमध्ये महिलांची अनोखी दहीहंडी
गोविंदा पथकांना हेल्मेट, महिलांना पैठणींचे वाटप
अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) : अंबरनाथ पूर्वेच्या गोविंद पूल लोकनगरी बायपास परिसरात भाजप महिला आघाडीतर्फे यंदाही खास महिलांसाठी दहीहंडी ठेवली होती. शहराध्यक्षा सुजाता भोईर यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. दहीहंडी उत्सवाची खासियत म्हणजे येथे हंडी फोडण्याचा मान केवळ महिला गोविंदा पथकांनाच दिला जातो. पुरुष पथके फक्त सलामी देतात.
कार्यक्रमात प्रत्येक महिला गोविंदा पथकाला रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट देण्यात आले. वाहन अपघातांमध्ये होणाऱ्या जखमांना आळा घालण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवल्याचे भोईर यांनी सांगितले. तसेच उपस्थित महिलांना पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले. सण-उत्सवांमधून परंपरा जोपासतानाच महिलांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी हा उपक्रम राबवतो. महिलांचा उत्साह पाहून अभिमान वाटतो, असे मत भोईर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले, अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नोट:- सोबत फोटो जोडलेले आहे.
शिवसेनेच्या दहीहंडीला तुफान गर्दी
मानाच्या हंडीत १,११,१११ रुपयांचे पारितोषिक मुख्य आकर्षण
अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या मानाच्या दहीहंडी उत्सवाने यंदाही उत्साह आणि कलात्मकतेची अनोखी मेजवानी दिली. सकाळपासूनच शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मंचावर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम नेहा केणे हिच्या सुरेल गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. कोळी गायक मिथुन कोंडवळे यांच्या कोळीगीतांवर गर्दीने ठेका धरला.
शहरातील सर्वांत मानाची समजली जाणारी दहीहंडी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने आयोजित केली होती. ‘दहीहंडी उत्सव २०२५’मध्ये तब्बल १,११,१११ रुपयांची विक्रमी हंडी ठेवली होती, जी मुख्य आकर्षण ठरली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या सोहळ्याची सुरुवात अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या हस्ते श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. सकाळपासून भजनमंडळांची रेलचेल सुरू होती. दुपारी भजनी गायक उमेश सुतार यांच्या गाण्यांनी रंगत वाढवली, तर सायंकाळी गायिका पल्लवी दाभोळकर आणि रोहिणी खैरनार यांच्या लावणीने उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचवला. उत्सवात अंबरनाथसह आजूबाजूच्या शहरांतील ३८हून अधिक गोविंदा पथकांनी सलामीचे थर लावले. प्रत्येक पथकाला विशेष पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
अंबरनाथ : शिवसेनेची मानाची हंडीला अनेकांनी उपस्थिती लावली.
स्वामी विवेकानंद बालवाडीत गोकुळोत्सव
लहानग्यांच्या खट्याळ हसण्यात दुमदुमली दहीहंडी
अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) : पश्चिमेच्या दि एज्युकेशन स्वामी विवेकानंद बालवाडीत चिमुकल्यांनी कृष्णजन्माष्टमीच्या आदल्या दिवशी जल्लोषात दहीहंडी साजरी केली. सकाळपासूनच लहानग्यांची किलबिल संपूर्ण शाळेत दुमदुमत होती. कोणाच्या डोक्यावर मोरपिसांची पाग, कोणाच्या खांद्यावर छोटीशी बासरी, तर कोणी गोपाळ-गोपिकांच्या वेशभूषेत सजलेले दिसत होते. या वेशभूषेतूनच बालकृष्णाच्या खट्याळ आठवणींना उजाळा मिळाला.
शाळेच्या आवारात रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली छोटी दहीहंडी लटकवण्यात आली होती. “गोविंदा आला रे आला!” या गजरात लहानग्यांनी हातात हात घालून छोटेखानी पिरॅमिड रचले आणि क्षणात हसत-खेळत दहीहंडी फोडली. दही, गोळ्यांच्या वर्षावात लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे मोती चमकले. या छोटेखानी पण उत्साही सोहळ्याला पालक, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी चिमुकल्या गोविंदांच्या खेळकर उत्साहाला दाद देत टाळ्यांचा वर्षाव केला. या गोकुळोत्सवाने बालवाडीच्या अंगणात सणाची रंगत अधिकच खुलली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.