दहीहंडीच्या उत्सवात ‘राजकीय काला’

दहीहंडीच्या उत्सवात ‘राजकीय काला’

Published on

दहीहंडी उत्सवात ‘राजकीय काला’
महापालिका निवडणुकीची रंगत वाढणार
हेमलता वाडकर
ठाणे, ता. १७ : भरपावसात विश्वविक्रमी थरथराटाने ठाण्यातील दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात अखेर पाड पडला. या वेळी गोविंदा पथकांनी लाखोंच्या बक्षिसांचे लोणी चाखले; मात्र हा उत्सव शिगेला पोहोचला असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय काला रंगल्याचे दिसून आले. कालपरवापर्यंत स्वबळाचा नारा देणारे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळाले, तर फेविकॉल का मजबूत जोड म्हणत पहिल्यांदा ठाण्यात एका मंचावर शिवसेना ठाकरे गट-राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे यांची आघाडी लक्ष वेधून गेली. यासर्व घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणूक आता एकतर्फी न होता महायुतीसमोर महाविकास आघाडीचे तगडे आव्हान उभे राहण्याचे संकेत मिळाले आहेत.

ठाण्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. थरांची स्पर्धा, कलाकारांची मांदियाळीमुळे दहीहंडी उत्सवात रंगत आली, पण राजकीय मंडळींची उपस्थिती आणि टोलेबाजीमुळे नव्या समीकरणाची नांदीही पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येथील मानाच्या हंडीपासून ते जिल्ह्यातील सर्वच प्रमुख दहीहंडी आयोजनात उपस्थिती दर्शवून ऑपरेशन सिंदूरपासून ते पालिका निवडणुकांमध्ये हंडी फोडण्याचा दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोच सूर आळवत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती होणार असल्याचे ठाम संकेत दिले. याला निमित्त ठरले ते ठाकरे बंधूंच्या एकत्रित निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे. या निर्णयामुळे यंदाच्या दहीहंडीत प्रचाराची दिशाच बदलल्याचे पाहायला मिळाले.

सकाळच्या सत्रात महायुतीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केली, तर त्याला प्रतिउत्तर सायंकाळच्या सत्रात महाविकास आघाडीने दिले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात अचानक ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे तिघे एकत्र आले. अविनाश जाधव यांनी तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा डीएनए एकच असल्याचे सांगितले. विचारे यांनीही मग फेविकॉलच्या जोडची उपमा दिली. यासर्व घडामोडी आगामी पालिका निवडणुकीची दिशा काय असणार याचे संकेत देऊन गेल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तगडे आव्हान
वास्तविक केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असली तरी गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना शिंदे गट आणि भाजप करत होती. ठाण्यात या दोन्ही पक्षांची ताकद वाढली आहे. सर्वाधिक माजी नगरसेवक शिंदे गटाकडे आहेत, तर भाजपचे बळही वाढले आहे. त्या तुलनेत आजच्या घडीला महाविकास आघाडीकडे मोजकेच माजी नगरसेवक हाताशी आहेत. मनसेचा एकही माजी नगरसेवक नाही. ठाकरे गटाकडे तीन ते चार माजी नगरसेवक शिल्लक आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडेही नऊ आणि काँग्रेसकडे तीन माजी नगरसेवकांची अल्प कुमक आहे, पण महाविकास आघाडीत मनसेची एण्ट्री झाल्याने मतांचे गणित फिरणार, हे नक्की समजले जात आहे.

आक्रमक चेहरे देणार उभारी
महायुतीकडे सत्ता आणि रसद आहे. प्रशासन हाताशी आहे, पण आता महाविकास आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी ठाण्यात आक्रमक चेहरे एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणूक राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी विरोधात लढली होती. ते आता एकत्र आले आहेत. या दोन्ही आक्रमक चेहऱ्यांना आव्हाडांची साथ मिळणार आहे. त्यामुळे नवीन व्यूहरचना आखून महापालिकेच्या निवडणुकीचा सामना हे तिघेही करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महायुती लावणार ताकद
मनसेकडे असलेली तरुण कार्यकत्यांची फळी, ठाकरे गटाकडे असलेला अनुभव आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असलेले व्हीजन या त्रिसूत्रीवर पालिकेची लढाई महाविकास आघाडी लढू शकते, पण महायुतीचे पारडे सध्यातरी जड आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढल्यास पालिकेवर महायुतीचीच सत्ता येईल, असे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे दहीहंडीत सुरू झालेला राजकीय काला गणपती, नवरात्रोत्सवापर्यंत कोणत्या दिशेने वळतो यावर निवडणुकांचे पुढचे गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com