गुन्हे वार्ता

गुन्हे वार्ता

Published on

जमीन हडपप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : भिवंडीच्या नांदगाव परिसरात कोट्यवधी रुपयांची जमीन हडप करण्यासाठी बनावट आधार व पॅन कार्ड तयार करून फसवणुकीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील अरुण दुधनाथ मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आरोपींनी त्यांच्या पत्नी व भावाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून भिवंडीतील नांदकर गावातील जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. ही जमीन दोन सर्व्हेमध्ये असून, तिचे क्षेत्रफळ १.४.९० हेक्टर इतके आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिना मोहम्मद अली खान, रसुलबी मुसाबली शेख आणि हेमंत सुरेश जाधव यांनी ५ डिसेंबर २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान भिवंडी उपनिबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून ही जमीन विक्रीला काढली होती. तपासादरम्यान सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास शांतीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड करत असून, या व्यवहारात इतर कोणी सहभागी होते का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

काम देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग
भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : काम देण्याच्या बहाण्याने बोलावलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ३० वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज अहमद रहेमानी असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील अजमेरनगर परिसरात राहणारी ३२ वर्षीय महिला ११ ऑगस्टला दुपारी कामावरून घरी परतत असताना अंजूरफाटा येथे सिराजने तिला थांबवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी हात लावून शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. घरी आल्यानंतर पीडितेने पतीला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर १४ ऑगस्टला दोघे नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सिराजविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली पाटील करीत आहेत.


घरफोडीत ६.६९ लाखांची रोख रक्कम चोरी
भिवंडी (वार्ताहर) : ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यात चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. ओवळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सागर कॉम्प्लेक्स गोदाम संकुलात चोरट्यांनी सहा लाख ६९ हजार १८ रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स कंपनीच्या गोदामामागील लोखंडी पत्रा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर सर्व्हर रूमच्या दरवाज्यावरील सीलिंग फोडून आत प्रवेश करून लॉकरमधील रक्कम चोरी केली. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी गौरव प्रदीप देशपांडे यांनी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील करीत आहेत.


भिवंडीत सोनसाखळी हिसकावून दुचाकीचालक फरार
भिवंडी (बातमीदार): मानकोली नाका परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनेने भिवंडीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदुपारी, बाजारात चाललेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावून पलायन केले.
सीमा बाबुराज कुरुंबूर या दुपारी चारच्या सुमारास बाजारात जात होत्या. त्यावेळी काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. या दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेनंतर सीमा यांनी तत्काळ नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com