उरण तालुका खड्ड्यांच्या विळख्यात

उरण तालुका खड्ड्यांच्या विळख्यात

Published on

उरण तालुका खड्ड्यांच्या विळख्यात
गणपतीपूर्वी दुरुस्तीची नागरिकांची मागणी
उरण, ता. १८ (वार्ताहर) ः उरण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था वाहनचालकांसह नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात अवजड वाहनांच्या मोठ्या वर्दळीमुळे तालुक्यातील सिडको, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी तालुक्यातील बहुतांश मार्ग ‘खड्डेमय’ झाले असून, अपघाताची शक्यता कायम आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन, व्यापारी व्यवहार तसेच वाहनधारकांचे हाल होत आहेत.
सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील आयओटीएल कंपनी ते नवघर गाव, नवघर–खोपटे मार्ग, भेंडखळ पेट्रोल पंप परिसर, खोपटे पूल, कोस्टल रोड सर्कल, उरण–पनवेल मार्ग, फुंडे हायस्कूल, नवघर रेल्वे पूल, खोपटा–कोप्रोली, चिर्ले–दिघोडे, दास्तान–चिर्ले रेल्वे पूल, जासई उड्डाणपूल तसेच द्रोणागिरी वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून सातत्याने कंटेनर आणि अवजड वाहने धावत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील चिर्ले–दिघोडे, जासई–गव्हाण व खोपटा–कोप्रोली मार्ग तर अक्षरशः धोकादायक झाले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यावरील डांबरच उखडून गेले असून, फक्त खड्ड्यांचे जाळे उरले आहे. या मार्गावरून आमदार, लोकप्रतिनिधी तसेच पर्यटक नियमित प्रवास करीत असतानाही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. अगदी अटल सेतूकडे जाणारा दास्तान–दिघोडे मार्गदेखील खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे.
.......................
स्थानिक ग्रामस्थ, सरपंच आणि सदस्यांनी यापूर्वी खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले होते, मात्र अद्याप परिस्थिती जसच्या तशी आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, नागरिकांचा रोष वाढला आहे. बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होऊ नये, यासाठी सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com