लहान पिल्लांची कत्तल

लहान पिल्लांची कत्तल

Published on

सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १७ : दोन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा मासेमारीचे उत्पादन समाधानकारक असले तरी लहान माशांची बेकायदा मासेमारी सर्रास सुरूच आहे. त्यामुळे मासेमारीचा हा प्रकार घातक असल्याने मत्स्यसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच संवर्धित राज्य मासा पापलेटचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पापलेट परवडेनासा झाला आहे. मोठ्या पापलेटला दर जास्त असल्याने लहान पापलेटची सर्रास विक्री होत आहे.

चंदेरी पापलेट अर्थात सरंगा मासा हा जगप्रसिद्ध मासा असून, महाराष्ट्रातील किनारी भागातून या मासाचे मोठे उत्पादन आहे, मात्र अलीकडच्या काळात हवामान बदलासह बेसुमार मासेमारी, लहान आकाराच्या पिल्लांची मासेमारी अशा विविध कारणांमुळे या माशांची प्रजाती धोक्यात आली आहे. राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने या माशाला विशेष दर्जा देऊन संवर्धनाच्या दृष्टीने त्याला राज्य माशाचा दर्जा दिला, मात्र त्यानंतरही लहान पिल्लांची मासेमारी सुरूच आहे.

पापलेटच्या लहान आकाराच्या मासेमारीमुळे मोठे विक्रीयोग्य पापलेट मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या काही ठिकाणी १०० ग्रॅमच्या आत असलेल्या पापलेटची मासेमारी होत आहे. या आकाराचे पापलेट किलोमागे ५० नग भरत आहेत. त्यांचा भाव एका टबला किंवा साधारण किलोमागे १,२५० असा आहे. हाच भाव तीन महिन्यांच्या या माशांच्या वाढीनंतर साडेबारा पट होतो. अर्थात लहान माशांच्या तुलनेत वाढ झालेले पापलेट लाखांचे उत्पन्न देतात.

पापलेट माशांचे महत्त्व पुढे आल्यानंतर करली, डोल या पद्धतीने या माशांची मासेमारी होऊ लागली, मात्र पुढे बेसुमार मासेमारीमुळे हा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला. १९८८ च्या दरम्यान या माशाचे उत्पादन १२ हजार टनाच्या आसपास होते. २०२२ मध्ये हेच उत्पादन पाच हजार टनाच्या खाली येऊन ठेपले आहे. पूर्वी ४० ते ४५ सागरी मैल अंतरावर पापलेटची मासेमारी केली जायची, मात्र आता १०० नॉटिकल पुढे मच्छीमारांना या माशाच्या मासेमारीसाठी जावे लागते. त्यामुळे लहान मासेमारी बोटी या मासेमारीतून बाद होऊ लागल्या आहेत. एलईडी, ट्रॉलर्स, पर्ससीन अशा बेकायदा मासेमारीमुळेही पापलेटच्या उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येतो.

सध्या बाजारात पापलेटच्या लहान पिल्लांची सर्रास विक्री होत आहे. कायदेशीर संवर्धनाच्या दृष्टीने लहान आकारमानाची पापलेट मासेमारी करणे गुन्हा आहे, मात्र मच्छीमारांमध्ये समन्वयाचा, जनजागृतीचा अभाव, तसेच सरकारी उदासीनता याचा परिणाम पापलेट संवर्धनावर दिसून येतो. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी लहान आकारमानाच्या पापलेटची मासेमारी राजरोसपणे आजही सुरू आहे.

अशी होते उत्पादनामध्ये घट
मॉन्सूननंतर पापलेट माशांची रुंदी २० सेंमी व लांबी १० ते २९ सेंमी असल्यास एका माशाचे वजन जवळपास १५० ते २०० ग्रॅम असते. या माशांना चांगला बाजारभाव मिळत असून, साधारणपणे ८५० ते १३०० रुपये प्रति किलो हा मासा विकला जातो. हाच मासा मार्च ते मे महिन्यात सरासरी १० सेंमी, तर रुंद आणि चार ते १७ सेंमी लांबीचा आढळत असून, त्यातील त्या वेळी एका पापलेटचे वजन ३० ते ५० ग्रॅमच असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. हा लहान मासा जेमतेम ७० रुपये प्रति किलो भावाने विकला जातो. तरीदेखील कमी आसाच्या जाळ्यांद्वारे मासेमारी सुरू ठेवली जात आहे.

आकारमानामध्ये घट
१९८०-८५ च्या काळात साडेतीनशे ग्रॅमच्या पापलेटचे २० हजार टन उत्पादन मिळत असे. त्यानंतर १९९० च्या दशकात माशाचे सरासरी वजन ३०० ग्रॅम होऊन माशाचे उत्पादन १५ हजार टन कमी झाले होते. नंतर २००० ते २०१० च्या काळात या माशाचे सरासरी वजन २०० ग्रॅमवर येऊन उत्पादन १२ हजार टनवर जाते, तर २०१० ते २०२० या काळात हा मासा १५० ग्रॅम वजनाचा मिळू लागला व जेमतेम १० टन उत्पादन मिळू लागले. राज्यात दिवसेंदिवस पापलेट माशांच्या सरासरी आकारात, वजनात आणि उत्पादनात घट होत असल्याचे दिसून आले आहे.

मासेमारी करणारी किनारी गावे व मत्स्य सहकार संस्था यांच्या एकत्रित बैठका घेऊन मत्स्यसंवर्धनाविषयी जनजागृती केली जात आहे. मासेमारी बंदरांवर परवाना अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करून लहान माशांची मासेमारी केली जात असेल, तर दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमारांनीही माशांच्या संवर्धनाच्या दृष्टीने लहान माशांची मासेमारी टाळावी.
- दिनेश पाटील, सह मत्स्यव्यवसाय आयुक्त, ठाणे-पालघर

मागील काही वर्षांतील पापलेटची मासेमारी
वर्ष उत्पादन (टन)
२०१८-१९ २९२.९१७
२०१९-२० २२७.२१३
२०२०-२१ ४५८.६१७
२०२१-२२ २२३.०७१
२०२२-२३ १३६.११३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com