४३७ महाविद्यालयांचा कारभार प्रभारींवर
४३७ महाविद्यालयांचा कारभार प्रभारींवर
राज्यात तब्बल १२ हजार प्राध्यापकांची पदे रिक्त
मुंबई, ता. १७ : राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाचा बाेजवारा उडाला असून राज्यात ४३७ महाविद्यालयांचा कारभार प्रभारी प्राचार्यांवर सांभाळण्याची वेळ आली आहे. तब्बल १२ हजार प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ‘एनईपी’च्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात समस्यांचा डाेंगर उभा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाची राज्यात पदवी, पदव्युत्तरच्या सर्वच अभ्यासक्रमांसाठी सुरू करण्यात आली आहे; परंतु या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक, प्राचार्य यांच्यासह ग्रंथपाल आदींच्या रिक्त पदाने मोठी आडकाठी आली आहे. राज्यातील शासकीय, अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची (अधिव्याखाता) तब्बल ११ हजार ९१८ पदे रिक्त आहेत. ४३७ महाविद्यालयांना प्राचार्यच नाहीत. त्यामुळे प्रभारी प्राचार्यांवर कारभार सुरू आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्राध्यापकांची ३१ हजार १८५ पदांपैकी तब्बल ११ हजार १९८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक रिक्त पदे पुणे जिल्ह्यात दोन हजार १६७ आणि त्याखालोखाल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल एक हजार ५८३ पदे, त्यानंतर नागपूर जिल्ह्यात एक हजार ४२८, अमरावती एक हजार २९३ आणि मुंबई, पनवेल मिळून २१ हजार १२७ पदे रिक्त असल्याची माहिती संचालनालयाने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली आहे. ही माहिती डिसेंबर २०२४च्या अखेरची आहे.
शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम
उच्च शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीत केवळ प्राध्यापकांची रिक्त जागांची माहिती दिली आहे. यात सहाय्यक, सहयोगी प्राध्यापकांच्या रिक्त जागांची माहिती आपल्याला देण्यात आली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते कोलारकर म्हणाले. दरम्यान, राज्यातील शासकीय, अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांच्या एक हजार १६६ पैकी ४३७ पदे, तसेच ग्रंथपालांच्या मंजूर १,१५४ पदांपैकी ३४१ पदे रिक्त आहेत. तर शारीरिक शिक्षण संचालकांच्या ९६१ पैकी २९४ पदे अजूनही रिक्तच ठेवण्यात आल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर याचे मोठे परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.