मूर्ती कारागिरांच्या कामात पावसाचे व्यत्यय
मूर्तिकारांसमोर पावसाने अडचणींचा डोंगर
खंडित वीजपुरवठ्यामुळे रंगकामात व्यत्यय, कारागिरांची लगबग
राजेश कांबळे : सकाळ वृत्तसेवा
पेण, ता. १८ : संततधार पावसामुळे गणेशमूर्तिकारांच्या कामात व्यत्यय येत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा आल्याने शाडूच्या मूर्ती वाळण्यास उशीर होत आहे, तर खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रंगकाम पूर्ण करण्याची धडपड कारागिरांची सुरू झाली आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेल्याने मूर्तींवर रंगरंगोटी केली जात आहे. पावसामुळे ही रंगरंगोटी बंदिस्त जागेत करावी लागते. त्यातच पडणाऱ्या पावसामुळे विविध अडचणींचा सामना जिल्ह्यासह पेणमधील कारागिरांना करावा लागत आहे. उशिराने तयार केलेल्या शाडूच्या मूर्ती वाळलेल्या नाहीत. त्यामुळे रंगकाम करता येत नाही. दक्षिण रायगडातील म्हसळा, श्रीवर्धन, महाड तालुक्यांमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मूर्तिकारांची कामे मंदावली आहेत. जादा मनुष्यबळ घेत हे काम पूर्ण करावे लागत असून, शिल्लक राहिलेले काम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान मूर्तिकारांसमोर आहे.
-----
कामावर होणारा परिणाम
माती लवकर सुकत नाही : गणेशमूर्ती बनवण्यासाठी शाडूची किंवा चिकणमातीची आवश्यकता असते. पावसाळ्यात हवामानातील आर्द्रतेमुळे मूर्तीची माती लवकर सुकत नाही. त्यामुळे मूर्ती तयार होण्यास जास्त वेळ लागतो.
रंगकामात अडथळा : मूर्ती सुकल्यानंतर त्यावर रंगकाम केले जाते, परंतु सतत पाऊस पडत असल्याने रंगकाम करताना अडचणी येतात. रंग ओला असल्यामुळे लवकर सुकत नाही. यामुळे मूर्तीची गुणवत्ता बिघडते.
जागा अपुरी पडते : अनेक मूर्तिकार खुल्या जागेत किंवा तात्पुरत्या शेडमध्ये काम करतात. पाऊस सुरू झाल्यावर मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना मोठी जागा मिळत नाही.
आर्थिक नुकसान : पावसाळ्यामुळे मूर्ती तयार होण्यास जास्त वेळ लागतो, तसेच काही मूर्ती खराब होतात. यामुळे मूर्तिकारांचे मोठे आर्थिक नुकसान होते. वेळेत मूर्ती तयार न झाल्यास त्यांना मिळणारी मागणीही कमी होते.
कामगारांची गैरसोय : पावसाळ्यात काम करणाऱ्या मजुरांनाही अनेक अडचणी येतात. मूर्ती तयार करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही, तसेच ओल्या वातावरणामुळे काम करणे अवघड होते.
-----
पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. याचा परिणाम शाडूच्या मातीच्या मूर्तींवर होतो. मूर्ती वाळलेल्या नसल्याने काळजीपूर्वक हाताळाव्या लागतात. त्याचबरोबर रंगकाम करताना थोडा वेळ द्यावा लागतो.
- सचिन समेळ, दीपक कला केंद्र, पेण
---
लहान मूर्तिशाळांमधील कारागिरांना जागेचा प्रश्न जास्त जाणवतो. पावसात मूर्ती खराब होऊ नयेत, यासाठी करावी लागणारी व्यवस्था जास्त खर्चिक पडते. नफा होण्यापेक्षा तोटा होण्याची जास्त शक्यता असते.
- महेश घरत, सायली कला केंद्र, नेहूली