सफाळेतील मैदानावर ‘पुणेरी पलटण’च्या कबड्डीचा सूर
विरार, ता. १८ (बातमीदार) : सफाळे येथील ओमटेक्स मैदान सध्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघाच्या सरावाचे ठिकाण बनले आहे. या मैदानावर आतापर्यंत क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय आणि रणजी संघ सरावासाठी आले आहेत. या वेळी प्रथमच कबड्डीचा संघ सरावासाठी आल्याने पालघरमधील होतकरू खेळाडूंना त्यांचा सराव पाहायला मिळत आहे.
व्यावसायिक क्रिकेटपटू आणि कबड्डीपटूंना लागणाऱ्या सुविधांनी युक्त सफाळ्यातील ओमटेक्स मैदान आहे. या ठिकाणी आतापर्यंत झिम्बाबे, नायजेरिया, युगांडासारख्या आंतरराष्ट्रीय संघांनी सराव केला आहे. काही महिन्यांपूर्वी सिक्कीमचा रणजी संघही येथे सरावासाठी आला होता. आता प्रथमच या ठिकाणी प्रो कबड्डीमधील पुणेरी पलटण हा संघ सरावासाठी आला आहे. देशात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या १२व्या हंगामाची सुरवात २९ ऑगस्टपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रो कबड्डी लीगमधील प्रतिष्ठित असा पुणेरी पलटणचा संघ सफाळे येथील ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये स्पर्धापूर्व तयारी व सरावासाठी दाखल झाला आहे.
पुणेरी पलटण संघाची निवड काही दिवसांपूर्वी झाली आहे. सध्या सराव करीत असलेले निम्मे खेळाडू गत संघातील आहेत, तर काही नवीन चेहऱ्यांना सामावून घेतले आहे. खेळाडू समन्वय, डावपेच, तांत्रिक कौशल्य, खेळाची रणनीती अशा बाबींवर सराव केला जात आहे. यापूर्वी बंगलोर येथे सराव करण्यात येत होता. आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटने या संघाला सरावासाठी आपले १५ हजार चौरस फुटाचे इनडोअर स्टेडियम उपलब्ध करून दिले आहे. हे सराव शिबिर २७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
३६ जणांचे पथक
पुणेरी पलटण संघाच्या १७ खेळाडूंसोबत १९ जण मदतनीस असून, या संघाचे मुख्य प्रशिक्षक माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अजय ठाकूर आणि अशोक शिंदे हे आहेत. या संघात अस्लम इनामदार, पंकज मोहिते, दादासाहेब पुजारी, आदित्य शिंदे, रोहन तुपारे, अभिषेक नादराजन हे महाराष्ट्राचे, तर मोईन नवीबक्ष आणि मिलाद मोहाजेर हे इराणी खेळाडू खेळत आहेत.
सफाळे येथील निसर्गरम्य वातावरण, ओमटेक्स व्यवस्थापनाने क्रिकेटबरोबरच कबड्डीसारख्या देशी खेळाच्या सरावासाठी पोषक वातावरण, इनडोअर स्टेडियम, अत्याधुनिक व्यायामशाळा, निवास, आदरातिथ्य अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता अनेक संघ सरावासाठी येतील.
- अजय ठाकूर, मुख्य प्रशिक्षक, पुणेरी पलटण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.