ठाण्यातील हंड्यांच्या ठिकणी चोरट्यांची हात सफाई
ठाण्यातील हंड्यांच्या ठिकाणी चोरट्यांची हातसफाई
चार घटनांत तीन लाखांचा ऐवज चोरीला; एका घटनेत चोरटा पोलिसांच्या हवाली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, (ता. १८) : टेंभीनाक्यावरील दहीहंडी आणि विष्णूनगर, भगवती येथील हंडीच्या ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई करून चार घटनांमध्ये एकूण तीन लाखांचा ऐवज लांबवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर नौपाड्यातील एका घटनेत मुंबईतील दोन मित्रांनी अंबरनाथ येथील चोरटा दीपक अभंगे (४८) याला पकडून नौपाडा पोलिसांच्या हवाली केल्याचे म्हटले.
चुनाभट्टी येथील प्रतीक वंजारे आणि त्यांचा मित्र अभिषेक हे दोघे १६ ऑगस्ट रोजी विष्णूनगर, भगवती मैदान येथे दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आले होते. दहीहंडी पाहताना सायंकाळच्या सुमारास वंजारेंच्या मानेला हाताने स्पर्श केल्याचे जाणवले असता, गळ्यात चेन नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मागे पाहिले. एक संशयित व्यक्ती पँटच्या खिशात हात घालून गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्या वेळी त्याच्या खिशात तुटलेली चेन मिळून आल्यावर त्याला नौपाडा पोलिसांच्या हवाली केले. याचदरम्यान पाच पाखाडी येथे दिनेश विचारे यांचीही ११ ग्रॅम वजनाची चेन चोरीला गेल्याचे आढळले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चरईतील गिरीश वैद्य यांच्याबाबतीतही असाच प्रकार समोर आला. याप्रकरणी रविवारी ठाणे नगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली असता त्यामध्ये त्यांची २.५ तोळे वजनाची चेन आणि गणपती पेंडंट असा सोन्याचा ऐवज गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अंधेरी, साकीनाका येथील शुभम आणि ओमकार यांच्यादेखील गळ्यात चेन नसल्याचे निर्दशनास आले. २.८ तोळे वजनाची चेन आणि गणपती पेंडंट असा दोन लाखांचा सोन्याचा ऐवज गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी ठाणे नगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.