गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मखरांचा ट्रेंड
गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मखरांचा ट्रेंड
आठशे ते दहा हजार रुपयांपर्यंत विक्री; मंडळांकडूनदेखील पसंती
वाशी, ता. १९ (बातमीदार) ः यंदाच्या गणेशोत्सवात नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये थर्माकोलऐवजी पर्यावरणपूरक मखरांचा ट्रेंड जोर धरत आहे. राज्य सरकारने थर्माकोलवर संपूर्ण बंदी आणल्यानंतर वाशी एपीएमसी बाजारपेठ, तुर्भे जनता मार्केट तसेच शहरातील गावठाण आणि नोड्स परिसरात विविध प्रकारची इकोफ्रेंडली मखरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे भक्तांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा कल अधिक दिसून येत आहे.
यंदा बाजारात देशी व विदेशी फुलांपासून तयार करण्यात आलेली मखरे, कापडी व कागदी फुलांची सजावट, वेत व बांबूच्या चटयांपासून बनवलेली मखरे, तसेच फोल्ड होणारी कागदी मखरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. याशिवाय कृत्रिम फुलांच्या कमानींनाही मोठी मागणी आहे. ताज्या फुलांचे दर वाढल्यामुळे आणि दहा दिवस टिकाव धरू न शकल्यामुळे नकली फुलांच्या कमानी पर्याय म्हणून ग्राहक पसंत करू लागले आहेत. वाशीच्या एपीएमसी बाजारपेठेत ८०० ते दहा रुपयांपर्यंत विविध प्रकारची मखरे व सजावट उपलब्ध आहेत. तुर्भे येथील जनता मार्केटमध्ये सिंहासन, पाळणा, पालखी, छत्री अशा प्रकारच्या मखरांचा समावेश असून, त्यांची किंमत ५०० ते १२ हजारांपर्यंत आहे. एपीएमसी घाऊक बाजारात ताज्या फुलांच्या १० ते १२ प्रकारच्या कमानी उपलब्ध असून, त्यासाठी हिरवा स्पंज, झाडू काड्या, सुतळ यांसारख्या साहित्यांचा वापर केला जातो. या कमानी बाराशे ते आठ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असून, दीड ते पाच दिवस टिकतात.
..................
यंदा गणेश महाल, सुवर्ण मखर, प्राचीन कोकण मंदिर, राजमहल अशा थीमवर आधारित मखरांनाही मोठी मागणी आहे. वाशी मिनी मार्केट, सेक्टर नऊ, १४ आणि १५ मधील दुकानदारांनी फोल्डिंग कागदी व कापडी मखरांची नवी शृंखला आणली आहे.
..................
सजावट साहित्यांचे दर
बाजारपेठेत लायक्रा कापड, कॉटन फूल, फायबर माळ, कार्डशीट कागद या साहित्यांपासून सजावट साहित्य तयार करण्यात आले आहे. दोन फूट आकाराची सजावट एक ते दीड हजार रुपयांत, तीन फूट आकाराची दोन ते तीन हजार रुपयांत, चार फूट आकाराची तीन ते साडेचार हजार रुपयांत तर पाच फूट सजावट आठ हजार रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे.
.................
टिकाऊ कापडी मखरे
फोल्डिंग कापडी मखरे विशेष आकर्षण ठरत आहेत. ही मखरे दहा वर्षांपर्यंत टिकू शकतात. गणेशोत्सवानंतर ते सहज फोल्ड करून सुरक्षित ठेवता येतात. त्यामुळे सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सवासाठीही यांची मागणी वाढली आहे. मखरविक्रेता नवीन नागरा (मोरया आर्ट) म्हणाले, पूर्वी थर्माकोल मखरांची मोठी मागणी असे; मात्र शासनाने थर्माकोलवर बंदी घातल्याने यंदा कागदी पुठ्ठ्यांपासून तयार मखरे उपलब्ध झाली आहेत; मात्र किंमत जास्त असल्याने ७० टक्के ग्राहक किफायतशीर कागदी फुलांचा वापर करून स्वतः मखरे तयार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.