दि. बा. पाटलांचे नाव विमानतळाला देण्यासाठी अनोखे आंदोलन

दि. बा. पाटलांचे नाव विमानतळाला देण्यासाठी अनोखे आंदोलन

Published on

विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्यासाठी अनोखे आंदोलन
पनवेल, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार जोरदार प्रयत्न करीत आहे. दरम्यान, या विमानतळासाठी जमिनी गमावलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणांनी आपले हक्क व मागण्या सरकारपुढे ठामपणे मांडण्यासाठी अनोखे आंदोलन केले. पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील नांदगाव टेकडीवर चढाई करून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
या आंदोलनात प्रकल्पग्रस्त तरुण, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनातून तीन महत्त्वपूर्ण मागण्या या वेळी करण्यात आल्या. यामध्ये विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, विमानतळामुळे जमिनी गमावलेल्या तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच पुनर्वसन पॅकेजामधील सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांना आधार दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे उपनेते बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोईर व बाळाराम पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उपाध्यक्षा भावना घाणेकर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्याचबरोबर दहा गाव समितीचे अध्यक्ष नाथा पाटील, राजेंद्र पाटील, सचिन केणी, विजय शिरढोणकर, विश्वास पेटकर आदींसह परिसरातील हजारो ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. सरकारने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी लांबणीवर टाकल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com