भूयारी मार्ग आणि मार्केट जलमय

भूयारी मार्ग आणि मार्केट जलमय

Published on

पावसाने दाणादाण
एपीएमसीत घाणीचे साम्राज्य, सखल भागात पाणी साठले
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे वाशीतील एपीएमसी मार्केटचे पाचही बाजार जलमय झाले होते. दुपारी पावसाचा जोर ओसरल्यानंतरही मार्केटमध्ये पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे बाजारात घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागला, तर रेल्वे मार्गासह रस्त्यांवरील भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेकांना कसरत करावी लागली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नवी मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. महापालिका हद्दीत अंतर्गत शहरात पाणी भरले नाही, पण पावसाचा एपीएमसी मार्केटला जोरदार फटका बसला. एपीएमसी प्रशासनाच्या धान्य, मसाला मार्केट, भाजीपाला, फळ, कांदा व बटाटा मार्केटमध्ये जलमय परिस्थिती झाली होती. मार्केट परिसरात अगदी दुपारपर्यंत पाणी ओसरलेले नव्हते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने केलेल्या स्वच्छतेची पोलखोल झाली. मसाला मार्केट, धान्य मार्केट, कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये पावसाळ्यापूर्वी केलेल्या स्वच्छतेवर प्रशासनातर्फे १० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील पावसाने पाचही मार्केटमध्ये पाणी साठले होते. कांदा, बटाटा मार्केटमध्ये आणि मसाला मार्केटमध्ये मलनिस्सारण वाहिन्या गाळात बसल्या आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतरही  स्वच्छता अधिकारी पाहणीसाठी फिरकले नाहीत. त्यामुळे बाजार समितीच्या आपत्ती व्यवस्थापन शून्य कारभाराविरोधात व्यापाऱ्यांमधून नाराजी उमटत होती.
----------------------------------------
महापालिकेचे दुर्लक्ष
साठलेल्या पाण्यातून वाट काढताना मालवाहू अवजड वाहने अडकल्यामुळे भाजीपाला, धान्य आणि मसाला मार्केटच्या आवारात झालेली वाहतूक कोंडी एपीएमसी मार्केटच्या रस्त्यावर आली होती. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचे पाणी उपसण्यासाठी कुठेच पंप लावण्यात आलेले नाहीत, अशी माहिती मसाला मार्केट व्यापारी अमरिष लाल वारद यांनी दिली.
-----------------------------------
भुयारी मार्ग पाण्याखाली
रेल्वेच्या ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील भुयारी मार्ग पाण्याखाली गेले. घणसोली, ऐरोली, तुर्भे आणि सानपाडा येथील भुयारी मार्गांमध्ये गुडघाभर पाणी साठले होते. त्यामुळे दिवसभर वाहनचालकांना वाहने काढताना तारेवरची कसरत झाली. सानपाडा भुयारी मार्गात साठलेले पाणी ओसरल्यास बराच वेळ लागला. उरण फाट्यावर डोंगराहून पावसाचे पाणी खाली आल्याने कोंडी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com