ठाणे परिसरात ९०९ बेकायदा बांधकामे
ठाणे परिसरात ९०९ बेकायदा बांधकामे
महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१९ : ठाणे परिसरातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात ठाण्यात ९०९ बेकायदा बांधकामे आढळली आहेत. त्यात सर्वाधिक ७४० बेकायदा बांधकामे ही दिव्यात असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने सोमवारी (ता. १८) उच्च न्यायालयाला देण्यात आली.
बेकायदा बांधकामांवर गणेशोत्सवानंतर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच इमारत पाडण्यासाठी येणाऱ्या खर्चाची वसुली ही त्या जमिनीच्या मालमत्ता कर शुल्काद्वारे वसूल करणार असल्याचेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. मुंब्रा येथील शिळ गाव परिसरात गेल्यावर्षी १७ बेकायदा इमारती उभारण्यात आल्या होत्या. या इमारती चार ते पाचमजली होत्या. या बेकायदा बांधकामांविरोधात सुभद्रा रामचंद्र टाकळे यांनी याचिका दाखल केली होती. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने विशेष अधिकारी नेमून त्या ठिकाणी पाहणी करण्याचे आणि त्या वेळी ठाणे महापालिका आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
कारवाईची आकडेवारी
नळजोडणी - २७५
बोअरवेल - ८९
मीटर जप्त - ४३
सर्वाधिक कारवाईचा प्रभाग - दिवा, कळवा, मुंब्रा, माजिवडा मानपाडा
अनधिकृत इमारतींची संख्या
दिवा - ७४०
कळवा - ४२
माजिवडा मानपाडा - ३४
मुंब्रा - ३२
एकूण अनधिकृत इमारती - ९०९
कारवाई केलेल्या इमारतींची संख्या - २२७
१०० टक्के निष्कासित इमारती - १७५
अंशतः कारवाई केलेल्या इमारती - ५२
एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल - ४४