तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय उघडेल!

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय उघडेल!

Published on

तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय उघडेल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. १८ ः खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभारली जात असून, कोस्टल रोड, अटल सेतू आणि काम सुरू असलेला वरळी-शिवडी लिंक रोड यामुळे या नव्या क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होईल. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सर्व मंजुरी शासन स्तरावरून जलदगतीने मिळतील. तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘गोल्डमन सॅक्स’च्या मुंबई येथील नवीन कार्यालयाचे उद्‍घाटन झाले. तेव्हा ते बोलत होते. गोल्डमन सॅक्सच्या नव्या कार्यालयाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, की मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. या जागतिक वित्त संस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उभारले जाणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित करणारी आहे.
तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय तसेच संशोधनासाठी आवश्यक सुविधा असलेले ‘इनोव्हेशन हब’ उभारण्यात येणार आहे. येथे क्वांटम कॉम्प्युटिंग तसेच कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित संशोधनास चालना दिली जाणार आहे. महाराष्ट्र हे गुंतवणूकस्नेही राज्य आहे. ‘इज ऑफ डुइंग बिजनेस’साठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. काही अडचणी आल्यास त्या तात्काळ सोडवल्या जात आहेत. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले. या वेळी गोल्डमन सॅक्सचे आशिया पॅसिफिकचे अध्यक्ष केविन स्नेडर, गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चॅटर्जी व इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com