बळीराजाच्या कष्टांची पावसाने मातीमोल
बळीराजाचे कष्ट पावसाने मातीमोल
मुंबई बाजार समितीतील लाखोंच्या शेतमालाचे नुकसान
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पाण्याखाली गेल्याने खराब झालेला शेतमाल फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बळीराजाचे कष्ट पावसाने मातीमोल झाल्याची स्थिती आहे.
राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील रस्ते वाहतूक प्रभावित झाली असल्याने जनजीवनही प्रभावित झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दोन दिवसांपासून एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यभरातून आलेला शेतमाल पडून असल्याने भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतमाल खराब होऊन फेकून द्यावा लागला आहे. तर फेकलेला कचरा उचलला गेला नसल्याने एपीएमसीत सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
------------------------------------------
घाणीचे साम्राज्य
फळ, भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर तलाव झाले आहे. साचलेल्या पाण्याने बाजारातील व्यापारी, शेतकरी तसेच माथाडी कामगारांचे चांगेलच हाल झाले. काही गाळ्यांमध्ये पाण्याचे धबधबे सुरू असल्याचे चित्र होते. बाजार आवारातील कचरा उचलला न गेल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
-------------------------------
२५ टक्के शेतमाल खराब
कांदा-बटाटा मार्केटमध्ये सरासरी दीडशे गाड्यांची आवक प्रतिदिन होत असते. एक गाडीतील मालाची किंमत साधारणतः तीन लाख रुपये असून साडेचार ते पाच कोटी रुपयांचा माल कांदा-बटाटा मार्केटमध्ये प्रतिदिन येतो. दोन दिवसांचा पावसाचा फटका बसून जवळपास २५ टक्के माल खराब झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे एक कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
-------------------------------
कोट्यवधीच्या नुकसानीची भीती
फळबाजारात दोनशे गाडी मालाची आवक प्रतिदिन होते. शीतगृह आणि इतर पर्याय साठवणुकीसाठी असल्याने भाजीपाला आणि कांदा-बटाटा मार्केटच्या तुलनेत फळ बाजारात शेतमाल खराब होण्याचे प्रमाण कमी आहे. काही फळे अधिक प्रमाणात टिकाऊ असल्याने विक्रीपर्यंत खराब होत नाहीत. जवळपास तीन कोटींहून अधिकची प्रतिदिन उलाढाल असली तरी कोट्यवधीच्या नुकसानीची भीती आहे.
--------------------------------
भाजीपाला दरात ५० टक्क्यांनी घट
भाजीपाला बाजारात प्रतिदिन सहाशेहून अधिक गाड्या भाजीपाला शेतमाल बाजारात येत आहे. पावसाने २५ टक्क्यांहून अधिक शेतमालाचे नुकसान झाले आहे. मेथी-कोथिंबिरीचे अधिक नुकसान झाले असून इतर भाजीपाला फेकून द्यावा लागला आहे. जवळपास सर्वच भाजीपाला दरात ५० टक्के घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. भाजीपाला बाजारात जवळपास चार कोटींहून अधिक उलाढाल असून एक कोटींहून अधिकचे नुकसान पावसाने झाल्याचा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत.
--------------------------------
फ्लॉवरला प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये बाजारभाव मिळत होता; मात्र पावसाने दर १३ ते १६ रुपयांवर आले आहेत. फ्लॉवर पिकावर काळे डाग पडल्याने दर मिळण्यास अडचण येते. पावसामुळे मुंबईला पाठवलेला माल ग्राहकांअभावी पडून राहतो. त्यामुळे सध्या स्थानिक व्यापाऱ्यांना देत आहोत; मात्र दुपटीने दर कमी मिळत आहे.
- राजेंद्र चिलप, शेतकरी
-------------------------------------------
दोन दिवसांपासून शेतमाल पडून असल्याने फेकून द्यावा लागला आहे. त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान होते. शिवाय शेतकऱ्यांचा शेतमाल नाईलाजास्तव फेकून द्यावा लागत आहे.
- अनिल नाईक, भाजीपाला व्यापारी
-----------------------------------------
दोन दिवसांच्या तुलनेत आज अजिबातच ग्राहक नाही. शिवाय पाणी साचण्याचे प्रकार होत असल्याने अनेक जण घराबाहेर पडण्याचा धोका स्वीकारत नसल्याने बाजारात शांतता आहे.
- अविनाश हिंगे, फळ व्यापारी
-------------------------------
पावसाचा जोर अधिक असल्याने बाजारात पाणी साचले आहे. लोकांना मार्केटमध्ये येण्याची सोय नाही. ग्राहक नसून माल पडून आहे,
त्यामुळे काही प्रमाणात शेतमालाचे नुकसान होते.
- अशोक वाळुंज, संचालक, कांदा-बटाटा मार्केट
---------------------------------
आजच्या पावसामुळे फळ बाजारात अजिबातच ग्राहक नाही. जवळपासच्या ग्राहकांमुळे १० टक्के मालाची विक्री झाल्याचे चित्र आहे. योग्यवेळी विक्रीअभावी राहिलेल्या फळांचे काही प्रमाणात नुकसान होते.
- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
----------------------------------------
तीन दिवस सलग पाऊस असल्याने कालचा दिवस वगळता दोन दिवस ग्राहक बाजारात होते; मात्र पावसामुळे मालाला उठाव कमी असून ग्राहक नसल्याने शेतमाल पडून आहे.
- शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.