वसईत पाणी तुंबल्याने हाल
वसई, ता. १९ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अनेकांची घरे पाण्याखाली गेली असून, अन्नाची वानवा निर्माण झाली. कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे वसई-विरार शहरात नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागांत मदतकार्य करीत नागरिकांना बाहेर काढावे लागले.
वसई स्थानक परिसरातील समतानगर, एव्हरशाईन, वसंत नगरी, मिठागर वस्ती, गोखिवरे, देवतलाव, गिरीज, गास, सनसिटी चुळणे मार्ग, तुळिंज, विरार, आचोळे, नायगाव, चंद्रपाडा यासह अन्य रहदारीचे मार्ग ठप्प झाले आहेत. संपूर्ण परिसर जलमय झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे प्रचंड कोंडी पाहावयास मिळाली. वसई शहरासह परिसरातील घरात पाणी शिरले. शहरी भागातील इमारती पाण्याखाली गेल्या असून, तळमजल्यावरील रहिवासी तसेच व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान झाले असून, मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने जरी पावसाळ्यापूर्वी नियोजन केल्याचा दावा केला असला तरी हा दावा फोल ठरला असून, लोकप्रतिनिधींनी यंदा वसई डुबणार नाही, असे आश्वासन नालेसफाई व पावसाळी उपाययोजना पाहणी करताना दिले होते. दरम्यान, पाणी तुंबल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शेती, बागायतीचे नुकसान
वसईत भातशेती व विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
महापालिका मुख्यालय मार्ग पाण्याखाली
वसई-विरार महापालिकेचे आधुनिक मुख्यालय उभारण्यात आले आहे. शहराचे नियोजन करणाऱ्या प्रशासनाच्या दारीच असलेला मार्ग जलमय झाला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वीजसेवा विस्कळित
मध्यरात्रीपासून जोरदार वारा आणि पाऊस सुरू असल्याने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे अनेक भागांतील मार्गावर वाहतूक विस्कळित झाली. याचा परिणाम वीजपुरवठ्यावर झाला. दरम्यान, अग्निशमन दलाने त्वरित झाडे बाजूला काढली. त्यामुळे दिलासा मिळाला.
ज्या भागात पाणी साचले आहे तिथल्या नागरिकांना मदतकार्य राबवत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच पाणीउपसा करण्यासाठी काम केले जात आहे. अतिवृष्टीचा इशारा असून प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन सतर्क आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
२५ मोठी झाडे उन्मळली
१०० जणांना रेस्क्यू
शेकडो घरांत पाणी
मालमत्तेचे नुकसान
कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
१२५ अग्निशमन कर्मचारी तैनात
सात बोटी घटनास्थळी
२५ मोठी वाहने रेस्क्यूसाठी
जेवणाची व्यवस्था
नजीकच्या भागात नागरिकांचे स्थलांतर
महापालिका मुख्यालय मार्ग पाण्याखाली
रेस्क्यू ठिकाणे
- किरवली वसई
- भोईदापाडा
- विरार भाताणे
- चुळणे
- वसई पूर्व मिठागर वस्ती
वसई : वसई-विरार शहरांत अग्निशमन विभागाकडून नागरिकांना रेस्क्यू करण्यात येत होते.