भरपावसातही श्रावणसरींच्या उत्साहाला उधाण

भरपावसातही श्रावणसरींच्या उत्साहाला उधाण

Published on

भरपावसातही श्रावण सरींच्या उत्साहाला उधाण
सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद
डोंबिवली, ता. २१ (बातमीदार) : मंगळवारी बरसणाऱ्या धो-धो पावसामुळे एकीकडे ठाणे जिल्हा जलमय झाला असताना कल्याणमध्ये महिलांनी झिम्मा-फुगडीचा आनंद लुटला. रॅम्पवॉक, गप्पा- टप्पा, कविता, गाणी गात एकेकाने आयुष्यातील किस्से उलगडले. लावणीच्या ठेक्यावर थिरकताना सर्व तणाव विसरून केवळ धम्माल-मस्तीचा अनुभव घेतला. सकाळ माध्यम समूहाने ‘श्रावण सरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कल्याण येथील अत्रे रंगमंच येथे ‘सकाळ श्रावण सरी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर असल्यामुळे हा कार्यक्रम होणार की नाही अशी धाकधूक महिलांच्या मनात होती, पण नियोजित कार्यक्रम होणार, श्रावण सरी बरसणार, हे कळताच महिलांनी तितक्याच उत्साहात आपला सहभाग नोंदवला, हे विशेष होते. नऊवारी साडी, नाकात नथ, मराठमोळे दागिने पारंपरिक साज, तर दुसरीकडे पाने, फुले, भाज्यांचा शृंगार करत पर्यावरण संवर्धन संस्कृतीला आधुनिकतेची जोड देत कल्याण-डोंबिवलीतील महिलांनी सकाळ श्रावणी सरीचा मनसोक्त आनंद लुटला. मॉर्डन मंगळागौर, श्रावण साज, श्रावण क्वीन, मी टाईम-टी टाईम आदी स्पर्धेत महिलांनी सहभाग घेतला.
सकाळ माध्यम समूह श्रावण सरी कार्यक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी एचडीएफसी म्युच्युअल फंड, सहयोगी प्रायोजक गोदरेज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ब्रेव्हरेज पार्टनर सोसायटी टी, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर, ईव्हेंट पार्टनर मी मंत्रा, नी एक्सपर्ट पार्टनर रिसर्च आयु यांचे सहकार्य लाभले आहे, तर कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून अर्चना पिंपळे व सुखदा कोरडे यांनी काम पाहिले. या वेळी रिसर्च आयुच्या डॉ. श्रद्धा निकम आणि केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे शिल्पा बुधकर आणि प्रसाद पाठक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर रसिका चव्हाण यांनी केले.

श्रावण सरीत लावणीमुळे रंगत (लावणी ग्रुप फोटो)
कार्यक्रमाची सुरुवात लावणी सम्राट आशिमिक कामठे यांनी बहारदार फुलवंती, मदन मंदिरी लावण्या सादर केल्या. आशिमिक यांच्यासोबत उपस्थित महिला आणि स्पर्धकांनीही लावणीमध्ये सहभाग घेतल्यामुळे रंगत आणखी वाढली.

मॉडर्न मंगळागौरमधून पर्यावरणाचा संदेश
मॉडर्न मंगळागौर या स्पर्धेत महाराष्ट्र संस्कृती व पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी मंगळागौर खेळाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमातून ‘मी पर्यावरण सखी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सण, उत्सवामध्ये एक महिला आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रदूषण रोखण्यासाठी, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो, याचे महत्त्व उपस्थित महिलांना समजविण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाची शपथही देण्यात आली.

नैसर्गिक दागिन्यांचा साज
‘श्रावण क्वीन’ स्पर्धा या वेळी विशेष ठरली. महिलांनी श्रावणातील फळे, भाज्या, पाने, फुले असे नैसर्गिक दागिने परिधान करत रॅम्पवॉक केला. त्यानंतर ‘टी टाईम-मी टाईम’ ही सोसायटी चहाच्या सौजन्याने स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये महिलांनी कविता, गाणी, विविध प्रसंग व आयुष्यातील घडणारे चहाचे किस्से सांगितले.

आर्थिक गुंतवणुकीचे धडे (फोटो- श्रेया कृष्ण)
बहुतेक गृहिणींना बरणीमध्ये पैसे साठवण्याची सवय असते. कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या वेळी हे पैसे कामाला येतात, पण बरणीत पैसे ठेवून त्याची वाढ होत नाही. त्याची योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठी रक्कम उभी राहू शकते. एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या श्रेया कृष्ण यांनी ‘बरणी से आजादी’ या उपक्रमांतर्गत गुंतवणूक कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी अनेक महिलांनी प्रश्न विचारून गुंतवणुकीबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

स्पर्धा आणि विजेते
टी टाईम-मी टाईम
प्रथम क्रमांक इंदिरा तमखाने, द्वितीय क्रमांक दिपाली दळवी, तृतीय क्रमांक मंगला गडवी.

मॉडर्न मंगळागौर
प्रथम क्रमांक जे श्री आणि अकॅडमी, द्वितीय क्रमांक योग संजीवनी ग्रुप, तृतीय क्रमांक मंत्रा ग्रुप

श्रावण साज
प्रथम क्रमांक मधुरा सावंत, द्वितीय क्रमांक नम्रता सरवणकर, तृतीय क्रमांक संगीता गोडे

मी पर्यावरण सखी
प्रथम क्रमांक मधुरा वझे,
द्वितीय क्रमांक वर्षा गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com