जाळ्यात पापलेट गावायचे नाय!
भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच पापलेट मिळाल्याने मच्छीमार सुखावला होता, मात्र हा आनंद काही दिवसच टिकला आहे. गेले काही दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे मासेमारी अर्धवट सोडून मच्छीमारांना किनाऱ्याला परतावे लागले आहे. परिणामी पापलेटसारख्या नगदी मासळीवर मच्छीमारांना पाणी सोडावे लागले. दुसरीकडे या वादळी वाऱ्याने समुद्रात सध्या मुबलक असलेला पापलेट मासा खोल समुद्रात निघून जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे समुद्रात पुन्हा मासेमारीला परत गेल्यानंतर पापलेट मिळेल की नाही, अशी भीती त्यांना सतावत आहे. वादळी वाऱ्यामुळे गेल्या आठवडाभरात मच्छीमारांचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाले आहे.
१ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेटसारखा खवय्यांची सर्वाधिक पसंती असलेला मासा मुबलक प्रमाणात लागला. त्यामुळे मुंबईपासून ते पालघर व डहाणूपर्यंतच्या मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सध्या पापलेटला बाजारात ७०० ते १४०० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून मासळीचा दुष्काळ सहन कराव्या लागत असलेल्या मच्छीमारांमध्ये पापलेटसारखा नंबरी मासा मिळू लागल्याने नवी आशा पल्लवित झाली होती.
१४ ऑगस्टला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. वादळी वाऱ्यामुळे समुद्र अशांत झाला. परिणामी मच्छीमारांना मासेमारी अर्धवट सोडून किनाऱ्याला परतावे लागले. ते अजूनही किनाऱ्यालाच आहेत. त्यामुळे समुद्रात मिळत असलेल्या पापलेटवर त्यांना अक्षरश: पाणी सोडावे लागले. समुद्रात चांगली मासळी असतानही मासेमारी होऊ शकत नसल्याने गेल्या आठ दिवसांत या पट्ट्यातील मच्छीमारांचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती मच्छीमारांचे नेते लिओ कोलासो यांनी दिली.
मासळी खोल समुद्रात जाण्याची भीती
दुसरीकडे वादळी वाऱ्याने समुद्र खवळला आहे. पाणी ढवळून निघत आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला पापलेट मासा समुद्रात आणखी खोल निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र शांत झाल्यानंतर मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली तरी पापलेट जाळ्यात लागेल की नाही, याची मच्छीमारांना शाश्वती नाही.
भरपाईची मागणी
पापलेटला राज्य सरकारने राज्यमासा म्हणून दर्जा दिला आहे, तर मासेमारीला शेतीचा दर्जाही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांत मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाबद्दल सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा व नुकसानभरपाई द्यायला हवी, अशी मागणी मच्छीमारांकडून होत असल्याचे लिओ कोलासो यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.