हजारो घरांतून जमा झालेल्या प्लास्टिकवर होणार आता पुनर्प्रक्रिया

हजारो घरांतून जमा झालेल्या प्लास्टिकवर होणार आता पुनर्प्रक्रिया

Published on

प्लॅस्टिकवर होणार पुनर्प्रक्रिया
नेरूळ , ता. २१ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता या अभियानांतर्गत प्रत्येक घर-प्लॅस्टिकमुक्त या संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रम स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. १५) राबविण्यात आला. या मोहिमेत शाळा, सोसायट्या, कार्यालये आणि विविध संस्थांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दोन्ही परिमंडळांमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाल उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
पालिकेच्या प्लॅस्टिक संकलनासाठी बनवलेल्या विशेष वाहनाद्वारे १४ संकलन केंद्रावरून संकलित करण्यात आलेले १४१ कि.ग्रॅ. प्लॅस्टिक एकत्रित करण्यात आले. हे प्लॅस्टिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी न जाता पुनर्प्रक्रियेद्वारे उपयुक्त वस्तूंमध्ये बदलले जाणार आहे. या वस्तू पुढील काळात सार्वजनिक ठिकाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहेत.
गृहनिर्माण संस्था, सोसायट्या, शाळा, कार्यालये आणि इतर संस्थांनी या मोहीमेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुकांनी प्रोजेक्ट मुंबई संस्थेशी किंवा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा तसेच नागरिकांनीही आपल्या घरातील स्वच्छ आणि कोरडे प्लॅस्टिक दर गुरुवार व शुक्रवार आपल्या नजीकच्या महानगरपालिका विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागात स्वच्छता अधिकारी अथवा स्वच्छता निरीक्षक यांचेकडे जमा करावे, असे आवाहन करण्यात येत आहे

Marathi News Esakal
www.esakal.com