घोडबंदररोडवर दिवसा अवजड वाहनांना बंदी
घोडबंदररोडवर दिवसा अवजड वाहनांना बंदी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : कापूरबावडी ते गायमुखपर्यंत वाहने वेगाने येत असतात; मात्र गायमुख-चेना या ठिकाणी रस्ता हा अरुंद असल्याने या ठिकाणी येऊन वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत घोडबंदर मार्गावरील मुख्य रस्ता व सेवारस्ता जोडण्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात यावी. केवळ रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात यावी, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत वाहतूक पोलिस उपायुक्तांना दिले.
ठाण्याहून वसई, गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग म्हणून घोडबंदरकडे पाहिले जाते. या मार्गावरून अवजड वाहनांसह हलकी वाहनांची वर्दळ अधिक आहे. त्या या मार्गावर मुख्य आणि सेवारस्ता जोडणी, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे घोडबंदरवासीय या रोजच्या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. यासंदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध कामांचा आढावा घेण्यासाठी घेतलेली बैठकीत वाहतूक कोंडीवर चर्चा केली, तसेच या वेळी सरनाईक यांनी काही सूचना व निर्देश वाहतूक विभागासह पालिका प्रशासनाला दिले. या वेळी घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसराचा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सातत्याने करण्यात येत आहे, परंतु पाऊस पडल्यानंतर हा रस्ता खराब होतो. या रस्त्यामुळे कोंडी होते, असे सातत्याने सांगितले जात आहे.
प्रत्यक्षात तसे चित्र नसून कोंडीचे कारण वेगळे आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता सुस्थितीत होता, त्या वेळीही वाहतूक कोंडी होत होती. कापूरबावडी ते गायमुखपर्यंत वाहने सुसाट येतात, पण गायमुख वळणावर रस्ता अरुंद असल्याने कोंडी होते आणि वाहनांच्या रांगा लागतात. अवजड वाहतुकीमुळे कोंडी वाढते, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत गुरुवारी (ता. २१) झालेल्या बैठकीत सांगितले.
सेवारस्ता जोडणीचे काम
दरम्यान, घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवारस्ता जोडणीचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या मार्गावर रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात यावी. तसेच त्या वेळे व्यतिरिक्त दिवसा होणारी वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात यावी, अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना बैठकीत दिल्या. याबाबत तातडीने अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त शिरसाट यांनी दिली.