भिवंडी गुन्हे वार्ता
अज्ञात वाहनाची दोन दुचाकींना धडक
एकाचा मृत्यू, एक जखमी
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावर सुरू असलेल्या आठपदरी रुंदीकरणासह रस्त्यांची दुरवस्था ही अपघातांना कारणीभूत ठरत आहे. अशाच एका अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, दुसरा एकजण जखमी झाला आहे.
अब्दुल्लाह खुर्शीद आलम अन्सारी (वय ३८, रा. नागाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अब्दुल्लाह हा गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मानकोली येथील गोदामातील रात्रपाळी संपवून दुचाकीवरून ठाणे–भिवंडीमार्गे घरी परतत होता. तो पिंपळास रेल्वे पुलाजवळ आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याच्या आणि किशोर कोळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात अब्दुल्लाह गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी मृतकाचे वडील खुर्शीद अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भाड्याने घेतलेल्या टेम्पोची विक्री
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडीत भाड्याने घेतलेला टेम्पो एका चालकाने परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. काप तलाव परिसरात गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे मुजम्मील मोहम्मद शेख यांनी त्यांचा टेम्पो मेट्रो हॉटेल येथे भाड्यासाठी उभा करून ठेवला होता. पाईपलाईन, कल्याण रोड येथील ओळखीचा चालक सर्फराज अब्दुल मन्नात चौधरी हा १६ जानेवारीला रात्रीच्या सुमारास तेथे आला. त्याने एक दिवसाच्या भाड्याने टेम्पो नेला; मात्र त्यानंतर गाडी परत आणलीच नाही. यानंतर सर्फराज याने परस्पर टेम्पो विक्री केल्याचे समोर आले. ही बाब उघड झाल्यावर शेख यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात चालक सर्फराजविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
साडेतीन लाखांची वीजचोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडीत टोरंट पॉवर कंपनीच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल तीन लाख ५८ हजार ९२९ रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील जय भगवान कम्पाउंड येथे पप्पू खंडागळे यांच्या मालकीच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही वीजचोरी करण्यात आली होती. कौशल तरे आणि कुशल खंडागळे यांनी १४ मे २०२४ पासून जवळच्या यंत्रणेतून बेकायदा वाहिनी जोडणी करून थेट वीजपुरवठा घेतला. त्यांनी मीटर न लावता विजेचा वापर केला. तब्बल १४ हजार ५३९ युनिट वीज वापरून आर्थिक फायद्यासाठी चोरी केल्याचे समोर आले आहे. टोरंट पॉवरच्या तपासात ही बाब उघड झाल्यानंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात कौशल तरे, कुशल खंडागळे आणि पप्पू खंडागळे यांच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा नोंदवला आहे.
भिवंडीत १७ वर्षीय मुलीचे अपहरण
भिवंडी (वार्ताहर) : शहरात अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. भोईवाडा पोलिस ठाणे हद्दीतून एक १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ईदगाह झोपडपट्टीतील चाळीत राहणारे यंत्रमाग कामगार अब्दुल गफुरलाल मोहम्मद अन्सारी यांची मुलगी गुरीयाखातून (वय १७ वर्षे ७ महिने) ही २० ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास शौचालयास जाते, असे सांगून गेली; मात्र ती परतलीच नाही. कुटुंबीयांनी परिसरात व शहरात शोध घेतला; परंतु ती न सापडल्याने वडिलांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या पत्नीला धमकी देत विनयभंग
भिवंडी (वार्ताहर) : शांतीनगर परिसरात अमली पदार्थांची विक्री व सेवन मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला धमकावून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बिलालनगर येथे राहणारी महिला रविवारी संध्याकाळी आपल्या काकूच्या घरासमोर उभी असताना, त्याच भागातील टिपू सुलतान चौक येथे राहणारा मोहम्मद सैफ युसुफ मोमीन हा हातात लाकडी दांडा घेऊन आला. त्याने संबंधित महिलेला, तुझा पती नशेखोरीविरोधात पोलिसांकडे तक्रार देत आहे. त्याला समजावून सांग; अन्यथा त्याचे व मुलाचे रक्त वाहील, अशी धमकी देत धक्काबुक्की केली. तसेच महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या घटनेबाबत महिलेने २१ ऑगस्टला पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार शांतीनगर पोलिस ठाण्यात मोमीनविरोधात धमकी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सायली शिंदे करीत आहेत.
कपडा व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक
भिवंडी (वार्ताहर) : शहरातील कपडा व्यावसायिकांकडून खरेदी केलेल्या कपड्याचे पैसे न देता दोघा जणांनी व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. कपडा व्यावसायिक राकेश जैन यांच्याकडून तालुक्यातील राहनाळ येथील धारणी आर्केट या गोदाम संकुलात माँ. अंबे सिंथटिकचे मालक दीपक जैस्वाल, राजेश शुक्ला यांनी जैन यांच्याकडून फेब्रुवारीमध्ये खरेदी केलेल्या ९ लाख ४१ हजार ८८० रुपये किमतीचा कापड खरेदी केला होता. त्यांचे पैसे न देता व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून जैस्वाल, शुक्लाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.