यंदा खड्डेय नम:!

यंदा खड्डेय नम:!

Published on

सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २३ : गेल्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक प्रशासन, तसेच विविध प्रशासनाकडून जिल्हा मार्ग, तालुका मार्ग, तसेच गावांना जोडणारे रस्ते व अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा या नावाखाली जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे उभे करण्यात आले, तरी पावसाळ्यात या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था बनली आहे.

रस्त्यात सर्वत्र खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अपघाताच्या घटनाही या खड्ड्यांमुळे घडलेल्या आहेत. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे कायम असल्याने श्रींचे आगमन खड्डेमय रस्त्यांवरून होणार हे मात्र निश्चित आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर घेतलेल्या समन्वय बैठकीमध्ये रस्ते व त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र या आदेशांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.

काही ठिकाणी मान्सूनपूर्व दुरुस्ती न झाल्यामुळे हे खड्डे आजही कायम आहेत. जीवघेण्या खड्ड्यावरून नागरिकांचा त्रासदायक प्रवास आजही सुरूच आहे. खड्ड्यामुळे वाहनांची नुकसानी तर होत आहेच, मात्र नागरिकांची हाडेही खिळखिळी होत आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण असून प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहेत.

पर्यटकांचेही हाल
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पालघर-केळवे रस्ता हा कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला होता, मात्र या रस्त्याची दुरवस्था झाली असून वळण नाका ते केळव्यापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पर्यटक केळव्याला जाण्यासाठी नाराजी व्यक्त करत आहेत.

ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त
तालुक्यातील बोईसर-पालघर प्रमुख मार्गासह रहदारीच्या रस्त्यावर ढवळे हॉस्पिटल, गोठणपाडा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक परिसरात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हायब्रीड ऍन्युटी अंतर्गत या रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले होते, मात्र रस्ते पूर्णपणे खड्ड्यांत गेल्याने वाहनचालकांसह नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. केळवे, सफाळे, आगारवाडी, एडवण, कोरे, मथाने, दातीवरे, मांडे, वेढी, भवनगड किल्ला रस्ता परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची ही दयनीय अवस्था असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com