प्रारूप प्रभाग रचना ''जैसे थे''

प्रारूप प्रभाग रचना ''जैसे थे''

Published on

प्रारूप प्रभाग रचना ‘जैसे थे’
ठाणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या कायम राहिल्याने इच्छुकांची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली. या प्रारूप प्रभाग रचनेत २०१७ प्रमाणे चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना असून एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असणार आहे. त्यामुळे ठाणे पालिकेत ३३ प्रभाग आणि १३१ नगरसेवकांची संख्यादेखील कायम राहणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत प्रभाग वाढण्याची शक्यता उराशी बाळगून असलेल्या अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा पडल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापलिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलादेखील सुरुवात झाली आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने शनिवारी (ता. २३) प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे. जाहीर केलेली प्रभाग रचना २०११च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात आली आहे. त्यामुळे २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीप्रमाणे आता ही चार सदस्यांचा एक प्रभाग आणि तीन सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना केली आहे. या प्रारूप आराखड्यावर पालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

ठाणे पालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर पालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती. तीन सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे ही रचना होती. या रचनेनुसार पालिकेने प्रभाग आरक्षण प्रक्रिया पार पाडली होती. त्यानुसार महापालिकेत १४२ नगरसेवक निवडून जाणार होते; मात्र राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती वादात सापडली होती. महाविकास आघाडी तीन सदस्य प्रभागासाठी आग्रही होती, तर महायुती त्याविरोधात होती. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर महायुतीने ही रचना रद्द केली होती.

प्रभाग व सदस्य संख्या कायम
ठाणे महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती. यात विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने प्रभाग रचना तयार करून ती प्रसिद्ध केली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. त्यानुसार ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही.

प्रभाग क्रमांक २५ सर्वात मोठा
ठाणे पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत कळव्यातील प्रभाग क्रमांक २५ हा सर्वात मोठा प्रभाग ठरला असून तेथील लोकसंख्या ही ६२ हजार ६९७ एवढी आहे. तर दिव्यातील प्रभाग क्रमांक २९ ठरला. हा सर्वात लहान प्रभाग असून येथील लोकसंख्या ही ३८,१७२ इतकी असून या ठिकाणी तीन सदस्य पालिकेत निवडून जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम
२१ ऑगस्ट - प्रारूप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता
२ ते ८ सप्टेंबर - प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती
९ ते १५ सप्टेंबर - पुन्हा नगरविकास खात्याकडून निवडणूक आयोगाला आराखडा सादर होणार
१६ ते १७ सप्टेंबर - अंतिम आराखडा नगरविकास खाते निवडणूक आयोगाला पाठवणार
३ ते ६ ऑक्टोबर - अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com