बाजार समितीच्या गाळे आणि गोदामांच्या विक्रीवर स्थगिती

बाजार समितीच्या गाळे आणि गोदामांच्या विक्रीवर स्थगिती

Published on

बाजार समितीच्या गाळे, गोदाम विक्रीवर स्थगिती
पणन विभागाकडून आदेश जारी, कमी दराने विक्रीची तक्रार
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) ः मुंबई बाजार समितीच्या वतीने गाळे आणि गोदामांच्या विक्रीच्या अनुषंगाने निविदा काढली आहे. मात्र या निविदेनुसार गाळे आणि गोदामांच्या विक्रीसाठी बाजारभावापेक्षा कमी दर ठरवल्याचा आरोप होत आहे. याबाबत पणन संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत पणन संचालकांनी गाळे आणि गोदामांच्या विक्रीवर स्थगिती आणली आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
मुंबई बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीचा कारभारही मोठा आहे. बाजार समितीच्या आवारात पाच वेगवेगळ्या बाजारपेठा आहेत. शेतकऱ्यांना सुविधा आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सुविधा पुरवल्या जातात. त्यानुसार शेतकऱ्यांसाठी, व्यापारांसाठी अतिरिक्त गाळे आणि माल ठेवण्यासाठी गोदामेही बाजार समितीच्या वतीने उभारली जातात. मात्र बाजार समितीमधील काही घटक, दलाल यामध्ये मध्यस्थी करून हे गाळे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. त्यासाठी बाजारभावापेक्षा कमी दराने हे गाळे आणि गोदामे विक्रीसाठी काढली आहेत. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप यानिमित्ताने केला जात आहे.

संघर्षाची शक्यता
बाजार समितीच्या अगदी मोक्याच्या जागेवर असलेल्या मालमत्ता कमी दरात विक्रीसाठी काढण्याचे संचालकांचे डावपेच असल्याची तक्रार पणन संचालकांकडे करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी प्रतिनिधी, मार्केट संचालक यांच्यामध्ये मोक्याच्या जागेवरून संघर्ष उफाळून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या तक्रारीची दखल घेत संचालकांनी या गाळे वाटपावर आता स्थगिती आणली आहे.

कोणते आहेत गाळे?
धान्य मार्केटमधील भूखंड क्रमांक दोनमधील २३
माथाडी भवनसमोरील भूखंड क्रमांक १५ येथील ५२ गाळे
फळ मार्केटमधील बहुउद्देशीय इमारतीतील १२८ गाळे

Marathi News Esakal
www.esakal.com