भर पावसातही मंडप, डेकोरेशन काम
भरपावसात मंडप, डेकोरेशनचे काम
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे डोंबिवली शहरात गणेशोत्सवाची लगबग चांगलीच वाढली आहे. सलग तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक मंडळांच्या तयारीला ब्रेक लागला होता; मात्र गेले दोन दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याने बाजारपेठांपासून ते मंडप डेकोरेशनच्या कामांपर्यंत सर्वत्र गती आली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये पूजेच्या साहित्याची, सजावटीच्या वस्तूंची आणि गणेशमूर्तींसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे. विक्रेत्यांचीदेखील चिंता काहीशी दूर झाली असून, बाजारपेठांमध्ये चैतन्य दिसू लागले आहे.
दुसरीकडे, अनेक गणपती मंडळांनी आता तयारीला अंतिम रूप द्यायला सुरुवात केली आहे. मंडप उभारणी, लाइटिंगची सजावट, स्टेज डेकोरेशन यासाठी काम करणारे कामगार दिवस-रात्र झटत आहेत. पावसामुळे काही कामे थांबलेली असतानाच आता उघडीप मिळाल्याने ही कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अनेक डेकोरेशन करणारे कामगार सांगतात की, ‘‘आम्हाला वेळेत ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत. पाऊस असला तरी थांबायचं नाही. पावसात भिजत, झाकून-झुरपत आम्ही आमचं काम करत आहोत.’’
या काळात अनेक मंडळांच्या बैठकादेखील सुरू असून, कार्यक्रमांची आखणी, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षेची व्यवस्था, गर्दी नियंत्रण यावर भर दिला जात आहे. प्रशासनाकडूनदेखील आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच, डोंबिवलीकर गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पावसाच्या अडथळ्यांवर मात करून गणेशभक्त आणि मंडळ कार्यकर्ते उत्साहाने सण साजरा करण्यासाठी तयार आहेत.