पारंपारिक तपास पद्धतीने हत्येचा उलगडा

पारंपारिक तपास पद्धतीने हत्येचा उलगडा

Published on

पारंपरिक तपास पद्धतीने हत्येचा उलगडा

गुन्हेगारांना शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सीसीटीव्ही व जीपीएससारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरून पोलिस तळागाळात लपलेल्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. त्याला धरून तुरुंगात डांबतात. कल्याणमध्ये मात्र एका महिलेच्या हत्येचा तपास आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही लागत नव्हता. सरते शेवटी पोलिसांनी अगदी जुनीच पद्धत वापरत आरोपीला जेरबंद केले. गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी पारंपरिक पद्धतीने केलेल्या तपासाचे महत्त्व अद्याप कमी झालेले नाही, हे यातून सिद्ध होते.

संतोष दिवाडकर, कल्याण

कल्याणजवळील अटाळी गावातील ज्ञानेश्वर नगरमधील एका चाळीत ६० वर्षीय रजनी चंद्रकांत पाटकर या एकट्याच राहत होत्या. संधीचा फायदा घेत २० मार्च रोजी चाँद उर्फ अकबर मेहबूब शेख (३०) नावाच्या व्यक्तीने पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. परोपकाराच्या भावनेने पाणी देण्यासाठी पुढे सरसावलेल्या रजनी यांच्यावर अचानक हल्ला करत त्याने त्यांची तोंड दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याने त्यांच्या अंगावरील एक लाख पाच हजार रुपयांचे दागिने (मंगळसूत्र, कर्णफुले) लंपास केले आणि पसार झाला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि क्राइम ब्रँचने तपास सुरू केला. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड आणि विजय गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. याप्रकरणी क्राइम ब्रँचदेखील समांतर तपास करत होते. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ८०० घरांच्या परिसरात कसून शोध घेतला. सीसीटीव्ही नसल्याने फॉरेन्सिक, श्वान पथक व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शोध घेऊनही गुन्ह्याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. स्थानिक सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊनही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. हत्येच्या काही दिवसांनंतर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी चाँद उर्फ अकबर शेखला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेला चाँद, आठ महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटला होता. याच संशयातून पोलिसांनी कसून चौकशी त्याच्याकडे केली असता, आपणच रजनी पाटकर यांचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत केले. मोमोजचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी त्याने पाटकर यांचा खून केल्याचे त्याने तपासात पोलिसांना सांगितले. सध्या चाँद न्यायालयीन कोठडीत आहे.

पारंपरिक तपास पद्धतीत साक्षीदारांवर कबुली जबाबांवर व प्रत्यक्ष विचारपूस यांवर भर असायचा. परिस्थितीजन्य पुरावे, बोटांचे ठसे, वस्तूंचे, कागदपत्रांचे परीक्षण आणि संशयिताच्या वर्तनाची चौकशी या गोष्टी विचारात घेतल्या जात असत. आधुनिक काळात या पद्धतींमध्ये विज्ञानाचे योगदान फॉरेंसिक, बायोमेट्रिक्सचे महत्त्व वाढले आहे. तरीही मानसिक कौशल्य, बारकाईने चौकशी आणि पुरावा संकलन याचे महत्त्व अद्याप कमी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांची पारंपरिक तपास पद्दत ही शास्त्र आणि कला या दोन्हींचा समन्वय आहे, असे म्हटले जाते.
...............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com