थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

तळाघर ग्रा. पं. तंटामुक्ती अध्यक्षपदी संदेश मोरे, उपाध्यक्षपदी संजय भगत
रोहा (बातमीदार) ः गावातील किरकोळ कारणांवरून निर्माण होणारे वाद मोठ्या स्वरूपात जाऊ नयेत आणि गावात शांतता तसेच बंधुभाव टिकून राहावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत तंटामुक्त समितीच्या निवड प्रक्रिया पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत तळाघरच्या ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निवडणुका पार पडल्या. या बैठकीत तळाघरचे माजी सरपंच संदेश मोरे यांची एकमताने तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर बोरघर येथील कार्यतत्पर सदस्य संजय भगत यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेदरम्यान गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. संदेश मोरे हे पूर्वी सरपंचपदावर कार्यरत असताना लोकाभिमुख कामकाज आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे व न्याय निर्णयक्षमतेमुळे तंटामुक्त समितीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष संदेश मोरे आणि उपाध्यक्ष संजय भगत यांनी गावातील शांतता राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये बंधुभाव टिकवण्यासाठी पूर्ण जबाबदारीने काम करू, असे आश्वासन दिले. गावातील तंटे वेळेवर सोडवून सामाजिक ऐक्य वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर अनेक मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
..............
विद्यार्थिनींनी घडवली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
खालापूर (बातमीदार) ः पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी खोपोली येथील रोटरी क्लबतर्फे ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती’ बनवण्याची स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली. या उपक्रमात परिसरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच पारंपरिक शाडू मातीच्या वापरास प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत सह्याद्री इंग्लिश स्कूल, शिळफाटा, खोपोली येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. सोनाली राजभर, पायल तावरे, प्रियांका राजभर, आदिती पाटील आणि श्रुतिका देशमुख या विद्यार्थिनींनी एकत्रितपणे गणेशमूर्ती साकारून परीक्षकांची मने जिंकली. सुंदर शिल्पकला, नाजूक तपशील आणि शाडू मातीचा उत्तम वापर हे त्यांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य ठरले.
स्पर्धेत शिशु मंदिर, खोपोली शाळेने द्वितीय क्रमांक, तर स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे परीक्षक आणि आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक केले.
....................
संत शिरोमणी नामदेव भजनी मंडळाला प्रथम क्रमांक
मुरूड (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक जतन या हेतूने मुरूड तालुक्यात महिलांसाठी विशेष भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत तालुक्यातील १० महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला. धार्मिक वातावरणात अभंग गायनाचे सूर गुंजत होते आणि श्रोत्यांनीही या सादरीकरणाचा मनमुराद आनंद घेतला. या स्पर्धेत संत शिरोमणी नामदेव भजन मंडळ, मुरूड यांनी प्रभावी सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना १० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक श्री बल्लाळ विनायक भजनी मंडळाला मिळाला. त्यांना सात हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तर तृतीय क्रमांक भैरव प्रासादिक मंडळाला मिळाला. त्यांना पाच हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय कोटेश्वरी महिला मंडळ आणि शारदोत्सव भजनी मंडळ यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादीचे नेते मनोज भगत, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, स्मिता खेडेकर, रायगड जिल्हा सोशल मीडिया उपाध्यक्ष हसमुख जैन, अजित कासार, महिला तालुका अध्यक्ष मृणाल खोत, सचिव विजय पैर आदी मान्यवर उपस्थित होते.
...................
पेण येथे जागतिक बंधुत्वदिनानिमित्त रक्तदान शिबिर
पेण (वार्ताहर) ः जागतिक बंधुत्वदिनानिमित्त राजयोगी ब्रह्माकुमारी प्रकाशमणी (दादी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पेण येथील गुजराती समाज सभागृहात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश समाजात एकता आणि मानवतेचा संदेश पसरवणे हा होता. या शिबिराचे उद्घाटन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी सेवा केंद्र पनवेलच्या प्रमुख तारादीदी, पेण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रसाळ, सहाय्यक पोलिस अधिकारी किशोर घरत, किशोर पाटील, सुनंदा पिंगळे आणि मधुकर साळुंखे यांच्या हस्ते झाले. या वेळी गुजराती समाज पेणचे योगेश शहा, प्रफुल्ल शहा, प्रवीण शहा, मुकेश शेठ, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व रायगड भूषण संतोष ठाकूर, गुरुदास वाघे, भालचंद्र थोरवे, कच्छ युवक संघाचे धनेश शहा, राजेश गाळा आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून या कार्यात सहभाग नोंदवला. याप्रसंगी नियमित रक्तदान करणारे किरण शहा आणि रामचंद्र गावंड यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सर्व रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. आयोजकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
...............
माणगावमध्ये पथदिव्यांची गैरसोय, नागरिक त्रस्त
माणगाव, ता. २४ (वार्ताहर) ः माणगाव नगर पंचायतीच्या हद्दीतील अनेक पथदिवे बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्याच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
पथदिव्यांच्या अभावामुळे नागरिकांना रात्री फिरताना एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात छत्री घेऊन सावधगिरीने पावले टाकावी लागत आहेत. अंधारात रस्त्यावरील खड्डे, विंचू, साप यांचा धोका वाढला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असूनही नगर पंचायतीकडून अद्याप योग्य दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. शहरात सुमारे २०० पथदिव्यांची मागणी आहे, मात्र पुरवठा अपुरा असल्याने अनेक रस्ते अंधारातच आहेत. काही ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचे नियोजन आहे, पण ते कधी होणार याची खात्री नाही. अडीच कोटींचा सोलार पथदिव्यांचा प्रकल्प कागदावरच अडकला असल्याचे सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात गाव प्रकाशमान राहावे, हीच माफक अपेक्षा माणगावकरांची आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तरी पथदिवे कार्यान्वित करावेत, अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे.
...........
डॉ. घरटकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
मुरूड (बातमीदार) ः समाजसेवेचे व्रत जोपासणारे दानशूर व्यक्तिमत्त्व डॉ. सनाउल्लाह घरटकर यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त मुरूड शहरातील संजीवनी आरोग्यसेवा केंद्रात भव्य रक्तदान शिबिर, तसेच क्लेष्ट आणि कॅनियोफेशियल तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा वसा घेतलेली ही संस्था गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असून, गरजू रुग्णांसाठी ती मोठा आधार ठरत आहे. संस्थेचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा, हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या संजीवनी आरोग्यसेवा संस्थेने आतापर्यंत हजारो रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. डॉ. घरटकर यांच्या सहकार्याने आयोजित या विशेष उपक्रमाचे उद्घाटन अप्सरी मकबूल कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात महात्मा गांधी मिशनचे दंत महाविद्यालय व रुग्णालय, कामोठे (मुंबई) यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात रक्तदान उपक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. जिल्हा रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखालील टीम आणि शहरातील रक्तदात्यांच्या सहकार्याने तब्बल ७१ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. रक्तदानासोबतच, क्लेष्ट आणि कॅनियोफेशियल शिबिरात २० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये जन्मजात फाटलेले ओठ व टाळू, चेहऱ्यावरील खूण, कान व चेहऱ्यावरील गाठ यांसारख्या आजारांचा समावेश होता. या सर्व रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया महात्मा गांधी मिशनच्या रुग्णालयामार्फत केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com