बाजारपेठांमध्ये झुंबड

बाजारपेठांमध्ये झुंबड

Published on

बाजारपेठांमध्ये झुंबड
पावसातही भाविकांचा खरेदीचा उत्साह
ठाणे, ता. २४ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्याने ठाणे शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. घरगुती गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. अधूनमधून पडणाऱ्या पावसालाही न जुमानता सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

गणपतीच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळांनी देखावे व सजावट पूर्ण केली आहे. घरगुती गणपतीसाठी सजावटीचा शेवटचा टप्पा सुरू असताना रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. रांगोळी, मखर, फुलमाळा, हार, डेकोरेटिव्ह पडदे, कृत्रिम फुले, पूजेचे साहित्य यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठा गजबजल्या होत्या. खरेदीसाठी भाविकांची गर्दी उसळणार असल्याची कल्पना असतानाही बाजारात सुरू ठेवण्यात आलेल्या बस, रिक्षांची वाहतूक आणि पावसामुळे मोठी कोंडी झाली होती.

बुधवारी (ता. २७) राज्यभरात गणपती आगमनाची धूम पाहायला मिळणार आहे. या सणाला राज्याच्या सणाचा दर्जा मिळाल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उत्साहाच्या वातावरणातच रविवारी ठाण्यातील बाजारपेठा गर्दीने तुडुंब भरलेल्या होत्या. नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोड, स्टेशन रोड, लोकमान्यनगर नाका, इंदिरानगर नाका, कोपरी बाजारात गणपती सजावटीचे साहित्य खरेदी केले जात होते.

यंदा पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढल्याने बाजारात पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंना अधिक मागणी आहे. थर्माकॉलवर बंदी असल्याने स्पंज, कागदी पुठ्ठा, लाकडी फोल्डिंग मखर, कागदी आणि प्लॅस्टिक फुले, माळा अशा पर्यायांचा ग्राहकांनी स्वीकार केला आहे. प्लॅस्टिकऐवजी नैसर्गिक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या सजावट वस्तूंच्या पर्यायाकडे कल वाढलेला दिसतो आहे.

मखमली पडद्यांना मागणी
बाजारात यंदा जाळीच्या रंगबिरंगी पडद्यांना मोठी मागणी आहे. घरगुती सजावटीसाठी लोकांनी पडद्यांच्या दुकानावर गर्दी दिसत होती. त्यात मखमली आणि झालरच्या पडद्यांना लोकांकडून पसंती दिली जात होती.

कृत्रिम फुलांनाही पसंती
घरगुती सजावटीसाठी लोकांकडून कृत्रिम फुले, माळांना मोठी मागणी होती. या फुलांच्या दुकानांमध्ये गर्दी झालेली होती. विविध रंगांच्या माळा, फुलांनी दुकाने भरलेली होती.

वाहनांमुळे लोकांची कोंडी
ठाण्यातील बाजार वाहतुकीच्या रस्त्यांवर भरविले जात असल्याने सण-उत्सवाच्या काळात बाजारात मोठी गर्दी होते. त्याअन्वये रविवारी दिवसभर बाजारात लोकांकडून खरेदी सुरू असताना वाहनांची वाहतूक सुरू होती. स्टेशन रोडवर भरलेल्या बाजारामधून ठाणे महापालिकेची परिवहन बस सेवा सुरू असल्याने बाजारात वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका प्रवासी आणि ग्राहकांना झाला.

पावसातही खरेदी :
दुपारी ११ वाजल्यापासूनच ठाण्यातील बाजार फुलून गेले होते. अशातच अधूनमधून पाऊस सुरू असतानाही खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. सायंकाळी बाजारामधून चालणे कठीण झाले होते.

कृत्रिम फुलांचा दर
एक फुल - ५० रुपये
फुलांचा गुच्छ - ३०० - ४०० रुपये
फुलांची माळ (चार फूट) - २०० रुपये
फुलांच्या माळांनी सजवलेले मखर - ४,०००-८,००० रुपये

मण्यांचे हार
गणपतीच्या गळ्यात घातल्या जाणाऱ्या विविध आकारांच्या आणि आकर्षक मण्यांच्या माळांना मोठी मागणी असून, त्यांच्या खरेदीसाठी दुकानांसमोर मोठी गर्दी झाली होती. २०० रुपयांपासून २,००० रुपयांना या माळा विकल्या जात होत्या. एरवी शालेय साहित्याच्या खरेदीसाठी उघडलेल्या दुकानांत रविवारी सजावटीसाठी लागणारे साहित्य, रंग, पेन्सिल, फेव्हिकॉल, विविध रंगांच्या टिकल्या, कटर अशा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती.
................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com