गाववाल्यांनू गावाक चला
गाववाल्यांनू गावाक चला
गणेशोत्सवासाठी कल्याण, विठ्ठलवाडी आगारातून ८१८ बसचे नियोजन
संतोष दिवाडकर : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. २४ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईसह मोठ्या शहरांतून हजारो कोकणवासीय दरवर्षी गावाकडे रवाना होतात. यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत, महाराष्ट्र एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी पाच हजार१०३ बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या बस मुख्यत्वे मुंबई, ठाणे, पालघर या विभागांमधून कोकणातील विविध गावांसाठी सोडण्यात येत आहेत. कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातून यंदा ८१८ एसटी गाड्या मार्गस्थ होत असून, यात राजकीय पक्षांनी आरक्षित केलेल्या बसचाही समावेश आहे.
कल्याण एसटी आगारातून कोकण व इतर ठिकाणी एकूण ५३२ एसटी बस रवाना होत आहेत. यातील ४४४ एसटी गाड्या राजकीय पक्षांमार्फत आरक्षित केल्या गेलेल्या आहेत. शनिवार (ता. २३) ते मंगळवारपर्यंत (ता. २६) या गाड्या कल्याण, डोंबिवली व दिवा येथून कोकण व इतर ठिकाणी रवाना होणार आहेत. विठ्ठलवाडी एसटी आगारातूनही एकूण २८६ एसटी गाड्या मार्गस्थ होत असून, यामध्ये प्रवासी आरक्षणाच्या ८० व गट आरक्षण तसेच राजकीय पक्षांनी आरक्षित केलेल्या २०६ गाड्यांचा समावेश आहे. शनिवारी (ता. २३) विठ्ठलवाडी देवगड या पहिल्या एसटीची पूजा करीत ही एसटी कोकणाकडे रवाना झाली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. महामंडळाने महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटदरात खास सवलती दिल्या असून, गणेशोत्सवासाठी लागू केलेली ३० टक्के तात्पुरती भाडेवाढही रद्द केली असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हजारो प्रवासी व कुटुंबीय आपापल्या गावाकडे मार्गस्थ होत आहेत. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षित, सुरळीत आणि सवलतीच्या प्रवासाची विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती आगारप्रमुख महेश भोये व नवज्योत गावडे यांनी दिली आहे.
गैरसोयीचा फटका
एसटी महामंडळाने पाच हजारपेक्षा अधिक जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या सर्व बस राज्यभरातील आगारातून मुंबई, ठाण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन सण-उत्सवात इतर भागात वाहनांचा तुटवडा भासतो. परिणामी शहरातून गाव-खेड्याकडे जाण्यासाठी वाहने उपलब्ध नसल्याने संबंधित आगारांना फेऱ्याही रद्द कराव्या लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशा परिस्थितीत बऱ्याचदा खासगी वाहनांवर वारेमाप खर्च करून गावी जाण्याचीही नामुष्की इतर भागातील नागरिकांवर ओढवते. एसटी रद्द झाल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून येतात; मात्र एसटी कोकणात गेल्याने आगारात वाहनांचा तुटवडा असल्याची कारणे प्रवाशांना दिली जातात. कोकणानंतर पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर भागातही गणेशोत्सवाचा उत्साह असतो, मात्र अपुऱ्या एसटीसेवेमुळे प्रवाशांचे हाल होतात.
कल्याण एसटी आगाराचे नियोजन
वार प्रकार संख्या सुटण्याचे ठिकाण
शनिवार प्रवासी आरक्षण ५ विठ्ठलवाडी आगार
रविवार प्रवासी आरक्षण ५ विठ्ठलवाडी आगार
गट आरक्षण २५ प्रवासी मागणीनुसार
राजकीय ३२७ सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली
सोमवार प्रवासी आरक्षण १६ विठ्ठलवाडी आगार
गट आरक्षण २७ प्रवासी मागणीनुसार
राजकीय ११७ रूनवल गार्डन, दिवा
मंगळवार प्रवासी आरक्षण १० विठ्ठलवाडी आगार
विठ्ठलवाडी एसटी आगाराचे नियोजन
दिनांक प्रकार संख्या सुटण्याचे ठिकाण
शनिवार प्रवासी आरक्षण ९ विठ्ठलवाडी, बदलापूर
गट आरक्षण ५ विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक समोर
रविवार प्रवासी आरक्षण २८ विठ्ठलवाडी, बदलापूर
गट आरक्षण १४८ १०० फूट रोड, श्री मलंगगड रोड
सोमवार प्रवासी आरक्षण ३६ विठ्ठलवाडी, बदलापूर
गट आरक्षण ४९ विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकसमोर
मंगळवार प्रवासी आरक्षण ११ विठ्ठलवाडी, बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.