कौटुंबिक वादात रखडले पुनर्वसन

कौटुंबिक वादात रखडले पुनर्वसन

Published on

शीतल मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. २५ : एका दाम्पत्यातील कौटुंबिक वादाचा फटका थेट संपूर्ण सोसायटीच्या पुनर्वसन प्रक्रियेलाच बसला आहे. तब्बल २५ कुटुंबांना यामुळे नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रहिवाशांच्या वारंवार विनंत्यांनंतरही एका महिलेच्या आडकाठीमुळे हा प्रकल्प रखडला आहे.
अंबरनाथ पूर्व वडवली परिसरातील २६ सदनिकांची गणेशप्रसाद ही सोसायटी पालिकेने धोकादायक ठरवली आहे. गेली आठ वर्षे या इमारतीचा पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर रहिवाशांनी सर्वानुमते पुनर्विकासाला मान्यता दिली. त्यामुळे दीड वर्षापासून बहुतेक कुटुंबे घर सोडून भाड्याने राहत आहेत. मात्र, याच इमारतीतील अंजली ठाकरे ही महिला मुलासह इमारतीतच राहते. तिचा पती कामानिमित्त दुबईत असून, दाम्पत्यातील कौटुंबिक वाद थेट न्यायालयात पोहोचला आहे. पुनर्वसन करार व मालकी हक्काच्या कागदपत्रांवर सातत्याने आक्षेप घेतल्याने प्रकल्पाला विलंब झाला आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पुनर्विकासकाने संबंधित महिलेला हमीपत्र देऊन तिच्या अटी मान्य केल्या आहेत. तरीही तिने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला आहे. यामुळे उर्वरित कुटुंबांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. भाड्याच्या घरांचा ताणही वाढला आहे.
सद्यस्थितीत सोसायटीची इमारत मोडकळीस आली असून, खिडक्या, स्लॅब तुटलेले आहेत. रहिवाशांना जीवितहानीचा धोका निर्माण झाल्याने त्यांनी महिलेला इमारत रिकामी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिच्या हट्टामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. इतकेच नव्हे तर तिने सोसायटीच्या प्रवेशद्वारालाच कुलूप लावले आहे. ज्यामुळे इतर रहिवाशांना त्यांच्या घरात जाण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

माझा नवरा व मुलीचा मृत्यू झाला असून, मी ६६ वर्षीय निराधार महिला आहे. ही इमारत पुनर्वसनासाठी गेल्याने दीड वर्षापासून भाड्याच्या घरात राहते. मला कामधंदा नाही किंवा नवऱ्याची पेन्शनही नाही. त्यामुळे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करते. भाड्यासाठी कर्ज काढावे लागले. पुढे कर्ज काढणे शक्य नसल्याने लवकरात लवकर पुनर्विकास होऊन हक्काचे घर मिळावे, हीच मागणी. याच सोसायटीतील पुष्पा आमजरे (६३) यांचीही सारखीच परिस्थिती आहे.
- अर्चना आहुटे, सदनिकाधारक

इमारत धोकादायक झाल्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र या दाम्पत्याच्या वादामुळे तो रखडला आहे. ही इमारत बनल्यास त्यांनाही घर मिळणार; मात्र तरीही त्या सोसायटीच्या मुख्य प्रवेद्वारालाच कुलूप लावल्या आहेत. यामुळे आमच्याच घरात जाता येत नाही. सोसायटीच्या कामात अनेक अडथळे निर्माण करत असल्याने काम रखडले आहे.
- प्राची परांजपे, रहिवासी

विकसकाने मला नोंदणीकृत हमीपत्र दिल्यास घर रिकामे करण्यास तयार आहे. सोसायटी पुनर्विकासात मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही.
- अंजली ठाकरे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com