प्रभाग रचनेवर हरकती घेण्यास अडथळा

प्रभाग रचनेवर हरकती घेण्यास अडथळा

Published on

प्रभागरचनेवर हरकती घेण्यास अडथळा
काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : आगामी पालिका निवडणुकीसाठी १२२ प्रभागांच्या ३१ पॅनेलचा प्रारूप प्रभाग आराखडा शुक्रवारी (ता. २२) रात्री जाहीर करण्यात आला; मात्र या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती घेण्यासाठी फक्त १३ दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, हरकतींसाठी वेळ पुरेसा नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. गणपती उत्सवाच्या काळात हरकत घेण्याचा कालावधी देण्यात आल्यामुळे सरकारने लोकांच्या सहभागाला अडथळा निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. नवीन सिंग यांनी केला आहे. त्यांनी या वेळेची त्वरित वाढ करून हरकत घेण्याचा कालावधी वाढवावा अन्यथा, काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. यासाठी १२२ प्रभागांसाठी चार सदस्यीय पॅनेल तयार केले असून, चार प्रभागांसाठी २९ पॅनेल आणि तीन प्रभागांसाठी दोन पॅनेल म्हणजे एकूण ३१ प्रभाग पॅनेल जाहीर केले आहेत. या प्रभागरचनेवर हरकत घेण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत म्हणजे १३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

ॲड. नवीन सिंग म्हणाले, ‘‘महायुती सरकारने प्रभागरचना आपल्या पक्षाच्या हितासाठी तयार केली असल्याचा भास होतो. लोकांना हरकत घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही. गणपती उत्सवाच्या काळात लोकांच्या घरी बाप्पाचे आगमन असल्याने लोक हरकत घेण्यात अपयशी ठरतील. त्यामुळे शासनाने वेळ वाढवून द्यावा.’’ सरकारने आपली मागणी नाकारल्यास काँग्रेसकडून आंदोलन करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com