नवी मुंबईत महायुती दुभंगणार ?

नवी मुंबईत महायुती दुभंगणार ?

Published on

महायुती दुभंगणार?
शिंदेंवरील वक्तव्यांमुळे भाजपविरोधात नाराजी
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार होणारी टीका, महापालिकेच्या प्रभागरचनेत झालेली मोडतोड अशा कारणांमुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतील अंतर वाढले आहे. भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी अनेक वेळा नामोल्लेख टाळताना केलेल्या टीकेमुळे शिंदे सेनेमध्ये असंतोष वाढला आहे. परिणामी, महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी दोन्ही पक्षांतील नेत्यांनी सुरू केल्याने नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र महायुती दुभंगण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई पालिका आणि गणेश नाईक हे एकच समीकरण मानले जाते. महापालिकेचे राजकारण नाईकांभोवती फिरते. परंतु या समीकरणाला शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात सत्तेमध्ये शिवसेना शिंदे गट बसल्यानंतर नवी मुंबईतील सेनेच्या नेत्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली या मतदारसंघांत शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी करून ताकद दाखवली. नगरविकास विभागाच्या आशीर्वादाने महापालिकेतील कंत्राटे आणि विकासकामे पदरात पाडून घेण्याच्या शर्यतीमध्येही शिंदे सेनेचे नेते पुढे गेले आहेत. हा घाव वर्मी लागल्याने भाजप नेत्यांकडून कोविडकाळातील भ्रष्टाचारावरून शिंदे सेनेच्या नेत्यांवर टीका केली जात आहे.
---------------------------------------
शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा
कधी काळी १११ नगरसेवकांपैकी पूर्वीच्या राष्‍ट्रवादीकडे काँग्रेसच्या सोबतीने सर्वाधिक नगरसेवकांचे बल होते. पण आता नवी मुंबईच्या राजकारणात माजी नगरसेवकांकडून प्रवेशाकरिता शिंदे सेनेला पसंती दिली जात आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गटातील माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचा शिंदे गट भाजपला सदस्य संख्येत मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र नवी मुंबईत दिसण्याऐवजी शिवसेना-भाजप असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता अधिक आहे.
---------------------------------------
नवी मुंबईतील २०१५चे पक्षीय बल
राष्ट्रवादी काँग्रेस - ५२
काँग्रेस - १०
शिवसेना - ३८
भाजप - ७
अपक्ष - ५
----------------------------------------
२०२५ पक्ष प्रवेशानंतर नवी मुंबईतील परिस्थिती
भाजप - ५७
शिवसेना (शिंदे गट) - ४३
शिवसेना (ठाकरे गट) - ५
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - १
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - ३
काँग्रेस - १
अपक्ष - १
--------------------------------------
प्रभागरचना कोणाच्या पथ्यावर?
नवी मुंबई पालिकेच्या १११ जागांकरिता पहिल्यांदा पॅनेलनिहाय निवडणूक होणार आहे. २२ ऑगस्टला महापालिकेने पॅनेलनिहाय प्रभागरचना जाहीर केली आहे. चार सदस्यांचे एक पॅनेल तयार करण्यात आले आहे. नव्याने जाहीर झालेल्या पॅनेलच्या रचनांमध्ये आधीचे जुने प्रभाग फुटल्याची ओरड भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या पवार गटातर्फे ओरड सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सध्या मौन बाळगून असल्याने ही रचना त्यांच्या पथ्यावर असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे.
------------------------------------
नवी मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे. महायुतीच्या माध्यमातून महापालिकेवर भगवा फडकवयाचा आहे; परंतु भाजपच्या काही बड्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार टीका केली जाते. त्यामुळे पक्षात एकत्र लढण्याबाबत एकमत नाही. गरज पडल्यास स्वतंत्र लढण्याबाबत विचार करू शकतो.
- किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट, नवी मुंबई
------------------------------------
राज्यात महायुती म्हणून सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र लढायचे की स्वतंत्र लढायचे, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. पण नवी मुंबईत भाजपची ताकद जास्त आहे. महापौर पद आमच्याकडे होते. त्यामुळे गरज पडल्यास स्वबळावर सत्ता आणू शकतो. मित्रपक्षांतील नेत्यांवर होणाऱ्या टीका-टिप्पणीबाबत प्रदेशपातळीवर चर्चा होणे गरजेचे आहे. जिल्हा पातळीवर चर्चा होऊन काही फरक पडणार नाही.
- डॉ. राजेश पाटील. जिल्हाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com