मुंबईत साजरा होणार पर्यावरणस्‍नही गणेशोत्‍सव

मुंबईत साजरा होणार पर्यावरणस्‍नही गणेशोत्‍सव

Published on

मुंबईत साजरा होणार पर्यावरणस्‍नही गणेशोत्‍सव
शहरात २७५ हून अधिक कृत्रिम तलाव; मूर्तिकारांना ९९० टनांहून अधिक मोफत शाडू मातीचे वाटप
मुंबई, ता. २५ ः शहरामध्ये पर्यावरणस्‍नेही गणेशोत्‍सव साजरा व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष उपायोजना केल्‍या आहेत. श्री गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात, नागरिकांनी पर्यावरणस्नेही मूर्तींची खरेदी करावी, यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांतर्गत शहरात २७५ हून अधिक कृत्रिम तलाव सज्‍ज करण्यात येत आहेत.
मूर्तिकारांना यावर्षी ९९० टन शाडू माती मोफत देण्यात आली. तसेच १०२२ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडप उभारण्याकरिता जागाही मोफत देण्यात आली. यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर मूर्तिकरांना नैसर्गिक रंगांचेही वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी आता मुंबईकरांनीदेखील जास्तीत जास्त पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करून तिची प्रतिष्ठापना करावी आणि उत्सवानंतर कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन करावे. यासाठी पालिकेने कृत्रिम तलाव उभारले आहेत. मुंबईकरांनी या कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने यंदापासून श्रीगणेशोत्सवास ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून घोषित केले आहे. गणेशोत्सव हा मुंबईचा सांस्कृतिक मानबिंदू मानला जातो. गणेशोत्सव कालावधीत देश-विदेशातून पर्यटक मुंबईत येतात. या सर्व पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने हा महागणेशोत्सव अधिक उत्साहात आणि नियोजनबद्धपणे तसेच निसर्गस्नेही पद्धतीने साजरा करण्यासाठी भरघोस प्रयत्न केले आहेत. उत्सव कालावधीतील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे, उपाययोजना करण्यात येत आहेत.

असे करा विसर्जन
निसर्गस्नेही असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)मध्ये घडवलेल्या मूर्ती, अशा सर्व मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने संपूर्ण मुंबईत कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या तलावांमध्ये भाविकांनी मूर्ती विसर्जित करावी. तलावांची यादी बृहन्मुंबई महापालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच यादी पाहण्यासाठीचे क्यूआर कोड विविध माध्यमांतून प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यानुसार आपल्या घरानजीकचा तलाव शोधून तेथे मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

निर्माल्य संकलनासाठी सेवा
प्रत्येक मंडळाने श्रीगणेशोत्सव कालावधीत निर्माल्य साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था करावी. निर्माल्याचे व्यवस्थित वर्गीकरण करावे. तसेच ज्यापासून खत तयार करता येऊ शकत नाही असे पदार्थ वेगळ्या डब्यात जमा करावे. संकलित होणारे निर्माल्य हे महापालिकेच्या निर्माल्य वाहनास हस्तांतरित करावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या प्रशासकीय विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मोफत शाडूची माती
मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महापालिकेकडून उपक्रम राबविण्यात आले आहेत. यासाठी मूर्तिकारांना महापालिकेच्या संकेतस्थळावर (https://mcgm.gov.in) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गतवर्षी २०२४मध्ये २०० पेक्षा अधिक मूर्तिकारांना मिळून ५०० टन इतकी शाडू माती मोफत पुरवण्यात आली होती. त्या तुलनेत यावर्षी एप्रिल २०२५ पासूनच पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांनी मोठ्या प्रमाणात शाडू मातीची मागणी नोंदवली अणि महापालिकेने त्यांची मागणी पूर्ण केली, हे उल्लेखनीय आहे. यंदा मागणी करणाऱ्या मूर्तिकारांची संख्या ५००पेक्षा अधिक आहे. तसेच महापालिकेकडून शाडू मातीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट (९९० टन हून अधिक) वाटप करण्यात आली. मुंबईचे पर्यावरण आणि जनजीवन सुरक्षित राहावे, सण-उत्सव जल्लोषात साजरे करावेत आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षणही व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने हा उपक्रम राबविला आहे. मूर्तिकारांनी महापालिकेच्या या प्रयत्नांची वाखाणणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com