फुलाची आवक घटल्याने भाव गडगडले
फुलांची आवक घटल्याने भाव गडगडले
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : हरितालिका पूजन आणि गणेशोत्सवाच्या तयारीमुळे सणासुदीचे वातावरण असले तरी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुलांची आवक कमी झाली असून, पावसामुळे खरेदीदारांची वर्दळ घटल्याचे चित्र आहे. सोमवारी संपूर्ण दिवसभर पावसाची रिपरिप, त्यात खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहकांनी बाजार समितीकडे पाठ फिरवली.
येत्या दोन दिवसांत लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यंदा बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा विराजमान होणार आहेत. तत्पूर्वी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका देवीचे पूजन केले जाते. हरितालिका देवीच्या मनमोहक मूर्ती, पूजनासाठी लागणारी विविध प्रकारची फळे आणि फुले, दुर्वा, तुळस, सुपारी, अघडा, पाने, देवीच्या ओटीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले जाते; मात्र सोमवारी (ता. २५) पाऊस आणि वाहतूक कोंडीने महिला खरेदीसाठी घराबाहेर पडल्याच नाहीत. बाजार समितीत वातानुकूलित स्टोरेज नसल्यामुळे उरलेली फुले साठवण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घाऊक व्यापाऱ्यांची चिंता वाढली. कारण आवक झाली, पण विक्री मंदावली आहे.
८६३ क्विंटलची फुलांची आवक
कृषी उत्पन्न समितीत झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, अष्टर, आरकेट, सोनचाफा, गुलछडी, जास्वंद कळी आदी फुलांची ७३ वाहने (६८ लहान, पाच मोठी) राज्यभरातून आली आहेत. मात्र पावसामुळे महिलांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे आणि रस्त्यांची दुर्दशा पाहता महिलावर्गाने स्थानिक फुलविक्रेते व पूजा साहित्य दुकाने यांना प्राधान्य दिले.
कल्याण कुंभारवाडा येथे हरितालिकेच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून, या पूजेच्या वेळी वाळूची शंकराची पिंड करतात. त्यासाठी विक्रेत्यांनी वाळूची पाकिटेही विकायला सुरुवात केली आहे. विड्याची पाने किरकोळ बाजारात २० रुपयांना २५ पाने मिळत होती. केवडा ६० रुपये नग तर दुर्वा आणि तुळस जुडी २० रुपयांना मिळत होती. तर दोन देवी व शंकराची पिंड अशा वेगवेगळ्या मूर्तींची १०० रुपयांना विक्री होत होती. त्याचबरोबर मूर्तींचा दर्जा व आकार यानुसार त्याची किंमत वेगवेगळी असल्याचे विक्रेता सुरेश खोबरेकर यांनी सांगितले. तर गृहिणी सुरेखा मोरे म्हणाल्या, की बाजार समितीत जाण्याची इच्छा असूनही पावसामुळे व वाहतूक कोंडीमुळे नाइलाजाने स्थानिक खरेदीचा पर्याय निवडावा लागला.
हरितालिका व्रताचे महत्त्व
भाद्रपद शुद्ध तृतीयेला स्त्रिया सौभाग्यप्राप्तीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. पार्वतीने भगवान शंकरास पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या व्रतावर आधारित
उपवास, निर्जळी व्रत आणि सजवलेल्या मूर्ती ही पूजेची वैशिष्ट्ये आहेत. कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो.
भाव
विड्याची पाने - २० रुपये (२५ पाने)
केवडा - ६० रुपये नग
दुर्वा-तुळस जुडी - २० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.