टिटवाळा महागणपती : श्रद्धा, इतिहास आणि पौराणिक परंपरेचे संगमस्थळ
टिटवाळा महागणपती : श्रद्धा, इतिहास आणि पौराणिक परंपरेचे संगमस्थळ
अजय शेलार : सकाळ वृत्तसेवा
टिटवाळा, ता. २६ : टिटवाळा हे गाव आकाराने लहान असले, तरी त्याचे धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व खूप मोठे आहे. तेजसा (काळू) नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे गाव, कण्व ऋषींच्या वास्तव्याने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि ‘महागणपती’च्या दर्शनाने पावन झाले आहे. टिटवाळा महागणपती मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून ते इतिहास, पौराणिक परंपरा आणि विकासाचे एक संगम आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त इथून समाधान शांती आणि प्रेरणा घेऊन जातो. टिटवाळा हे महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेचा एक तेजस्वी दीपस्तंभ आहे.
महाभारतात वर्णन आहे की, टिटवाळा हे कण्व मुनींचे आश्रमस्थळ होते. येथेच शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची ऐतिहासिक भेट झाली. शकुंतलेने कण्व मुनींच्या सल्ल्यानुसार गणेशपूजा केली आणि त्या वेळेपासून येथे गणेशभक्तीची परंपरा सुरू झाली. त्यामुळे टिटवाळ्यातील गणपतीला ‘वरदविनायक’ किंवा ‘महागणपती’ म्हणून ओळख मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या मार्गावर असताना काही काळ टिटवाळ्यात थांबले होते, असा उल्लेख शिवचरित्रात आढळतो. शिवानी महाराणींचेही येथे वास्तव्य झाले होते. यामुळे या भूमीला शिवपवित्रतेचा विशेष अभिमान लाभलेला आहे.
महागणपतीचे तेजस्वी रूप
महागणपतीची मूर्ती अत्यंत भव्य व लक्षवेधी आहे. सुमारे तीन ते साडेतीन फूट उंच असलेल्या या चार भुजांच्या मूर्तीत – डाव्या हातात मोदकाची वाटी, उजव्या हातात जपमाळ, तर पाठीमागील दोन हातांत परशू व पाश आहेत. गळ्यातील अलंकार, गंडस्थळावरील हिरे, नागबंध व चरणांजवळ असलेले यक्ष-गंधर्व मूर्तीला अधिक तेजस्वी बनवतात. रिद्धी-सिद्धी व त्यांची मुले लक्ष-लाभ यांचेही मूर्तीत स्थान आहे.
भक्तांचा अनुभव
अमिताभ बच्चन यांच्या अपघातानंतर जया बच्चन यांनी येथे नवस केला होता आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, असे सांगितले जाते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनोहर जोशी यांच्यासारखे नेतेही येथे येऊन दर्शन घेतले आहेत.
परकीय आक्रमणांच्या
परकीय आक्रमणांच्या काळात अनेक देवतांच्या मूर्ती लपवून ठेवण्यात आल्या, त्यात टिटवाळ्याची ही मूर्तीही होती; मात्र १९६६ नंतर महागणपतीची ख्याती वाढू लागली आणि भाविकांची गर्दी वाढली.
विकासाची नवी दिशा
महागणपती मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. दोन मजली सभागृह, पार्किंग, बोटिंगसाठी तलाव, उद्यान, कारंजे, फेरफटका मारण्यासाठी ट्रॅक, व शॉपिंग सेंटर. २००४-०६ मध्ये सिद्धीविनायक ट्रस्ट व कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याने मंदिर परिसराचे सुशोभीकरण झाले.
ट्रस्टच्या प्रयत्नांमुळे सुमारे १००० नागरिकांना रोजगार मिळतो आहे. परिसरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही आहे. या मूर्तींच्या स्नानाचे पाणी ज्या पाइपमधून जाते, त्यात कान लावल्यास ‘पंढरपूर विठोबाची आरती’ ऐकू येते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
‘महागणपती रुग्णालय’
लोकसंख्येच्या वाढीसोबतच आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन ट्रस्टने ‘महागणपती रुग्णालय’ सुरू केले आहे. हिंदुजा हॉस्पिटलच्या सहकार्याने उभे राहिलेले हे अत्याधुनिक रुग्णालय म्हणजे मंदिर ट्रस्टच्या सामाजिक जाणिवेचे उदाहरण आहे. ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिनी, गरजूंना आर्थिक मदत याही सेवा येथे दिल्या जातात.
टिटवाळा कसे पोहोचावे?
टिटवाळा हे मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर असून, कल्याणपासून अवघ्या काही अंतरावर आहे. स्थानकापासून मंदिर फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे. रिक्षा किंवा पायीही सहज पोहोचता येते. मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर असल्यामुळे हे ठिकाण विशेष गर्दीचे केंद्र बनले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.