सेंट जॉर्ज रुग्णालयाला कोविडच्या चार वर्षानंतर पुन्हा उभारी,
सेंट जॉर्ज रुग्णालयाला कोविडच्या चार वर्षांनंतर पुन्हा उभारी
बाह्यरुग्ण विभाग पुन्हा कार्यान्वित झाल्याने रुग्णांना दिलासा, वॉर्ड सुरू करण्यावरही भर
भाग्यश्री भुवड, सकाळ वृतसेवा
मुंबई, ता. २६ : कोरोनानंतर अनेक अडथळ्यांना मागे टाकत दक्षिण मुंबईतील प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाला आता उभारी मिळाली आहे. तब्बल चार वर्षांनंतर आता टप्प्याटप्प्याने सेंट जॉर्ज रुग्णालयातील विविध विभाग आणि बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) पुन्हा कार्यान्वित होत आहेत. यातून दक्षिण मुंबईतील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. कोविडकाळात फक्त समर्पित कोविड रुग्णांवर इथे उपचार केले गेले. पण आता सर्व प्रकारच्या अवघड आणि सोप्या शस्त्रक्रियांसह ओपीडींचाही श्रीगणेशा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
पुढच्या काही महिन्यांत इथे बरेचसे नवनवीन वॉर्ड सुरू केले जाणार आहेत. यात प्रामुख्याने प्लॅस्टिक सर्जरी विभाग सुरू करण्यात आला आहे. यापाठोपाठ आता छाती विकार व टीबी रुग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून सुरू झालेल्या ओपीडीमुळे जे. जे. रुग्णालयावरील भार हलका होण्यास मदत झाली आहे. यासोबतच मनोविकृतीशास्त्र वॉर्डदेखील तयार करण्यात आला आहे; मात्र अद्याप या वॉर्डचे उद्घाटन झालेले नाही.
लवकरच त्वचा विकार विभागही सुरू करण्यात येणार आहे. मनोविकृतीशास्त्र विभागाअंतर्गत व्यसनमुक्ती केंद्र येत्या काही महिन्यांत सुरू केले जाणार आहे. ॲडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी या नावाने हे केंद्र असेल. याअंतर्गत दारूचे व्यसन, तंबाखूच्या व्यसनावर काम केले जाईल. शिवाय शॉक थेरपीदेखील दिली जाईल.
कोरोनामध्ये बंद झालेले वॉर्ड आम्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत. लवकरच नवीन वॉर्ड आणि सुविधा रुग्णांसाठी इथे उपलब्ध होईल. पूर्णपणे सक्षम रुग्णालय तयार करण्यावर आपला भर आहे. मनोविकृतीशास्त्र विभागाच्या एका पथकाअंतर्गत ४० खाटा दिल्या जातील.
- डॉ. विनायक सावर्डेकर,
वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय
छाती व टीबी रोग निदान
सहयोगी प्राध्यापक डॉ. स्मिता आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट जॉर्ज रुग्णालयाची छाती व टीबी रोग निदान ओपीडी सुरू करण्यात आली आहे. सध्या पाच खाटा महिलांना आणि पाच खाटा पुरुषांना या विभागांतर्गत देण्यात आल्या आहेत. वॉर्डचे सध्या बांधकाम सुरू असून, वॉर्ड तयार झाल्यावर खाटांची संख्या ३० होईल, असेही डॉ. सावर्डेकर यांनी स्पष्ट केले. यासह स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाचे रुग्णही पाहिले जातात. ओपीडीअंतर्गत येणाऱ्या रुग्णांना गर्भवती महिलांच्या प्रसूती आणि महिलांना लागणारे अत्यावश्यक उपचार व शस्त्रक्रियांची सोयदेखील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहेत.
जेजेवरील भार हलका होणार
सद्य:स्थितीत बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना उपचार दिले जातात. शिवाय रुग्णांना दाखलही करून घेतले जाते. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस बाह्यरुग्ण विभाग चालतो. वॉर्ड सक्षमपणे सुरू झाल्यावर आठवडाभर बाह्यरुग्ण विभाग सुरू होईल. सर्व प्रकारच्या चाचण्याही केल्या जातात. शिवाय ब्रोन्कोस्कोपीसाठीचीही मागणी केली आहे. अनेक रुग्ण जे.जे.मधूनही येतात. त्यामुळे जे. जे.वरील भार हलका होण्यास मदत होत आहे. नवनवीन उपकरणे आल्याने रुग्णांना उपचार देणे अधिक सोपे होईल.
- डॉ. स्मिता आगळे,
सहयोगी प्राध्यापक, छाती व टीबी रोग निदान कक्ष, सेंट जॉर्ज रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.