मंगलमय पर्वासाठी पालघरनगरी सज्ज
वसई, ता. २६ (बातमीदार) : विघ्नहर्ता, बुद्धिदाता अन् सुखकर्ता अशा लाडक्या गणरायाचे वाजत-गाजत आणि मोठ्या थाटात स्वागत करण्यासाठी अवघी पालघरनगरी सजली आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला उद्या (ता. २७)पासून प्रारंभ होणार असून, त्यासाठी पालघर जिल्हा जणू ‘गणरंगी’ रंगला आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ फुलल्या असून, फुले, दुर्वा व विविध साहित्यातून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत आहे.
१४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती लाडक्या बाप्पाची गणेशभक्त उद्यापासून मनोभावे आराधना करणार आहेत. आरतीचा आवाज, टाळ मृदुंगाची साथ व परिसर निनादणार आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा सज्ज झाला आहे. उत्साह, चैतन्याचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. आकर्षक, सुबक अशा मूर्ती सार्वजनिक गणेश मंडळात दाखल झाल्या आहेत. मुखदर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी ठिकठिकाणी गर्दी केली. ग्रामीण भागातील महिलांनी शहराची वाट पकडली आहे. काकडी, पपनस, दुर्वा, तुळस, कंटवली, केवडा, जास्वंद यासह विविध शेतमाल विक्री केला जात आहे. अचानक मागणी अधिक असल्याने भावदेखील वधारला आहे. शहरातील मिठाई, कपडे, आरास साहित्य व गणेशोत्सवात लागणाऱ्या पूजेच्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत.
गणपतीची आकर्षक मूर्ती, विविध देखावे पाहण्यासाठी, तसेच विविध ठिकाणी असणाऱ्या श्रीगणेश मंदिरात नातेवाईक, मित्रपरिवाराकडे दर्शनासाठी भक्त प्रवास करणार आहे. त्यानिमित्त प्रवासी वाहतूक सेवेलादेखील अच्छे दिन येणार आहेत. भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक मंडळाकडून स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. तर या उत्सवात पर्यावरण, सामाजिक बांधिलकी, उपक्रम असे तिहेरी दर्शनदेखील नागरिकांना घडणार आहे.
दुर्वाचा भाव वधारला
गणेश पूजनासाठी दुर्वांना महत्त्व असल्यामुळे मागणी वाढली आहे. विविध ठिकाणी दुर्वांची विक्री केली जात असून १० रुपये जुडी भाव आहे. गणेशोत्सव वगळता दुर्वा जुडीमागे पाच रुपये आकारले जातात.
कंठी, फुलांना भाव मिळणार
जास्वंद , मोगरा, झेंडू या फुलांना सर्वाधिक मागणी आहे. बाजारपेठेत या फुलांचे भाव गतवर्षीपेक्षा पाच ते १० रुपयांनी किलोमागे वाढले आहेत, मात्र नागरिकांचा खरेदीकडे कल असल्याचे दिसून येत आहे.
मूर्तिकारांना विश्रांती
गेले तीन महिने गणेशमूर्ती घडविण्याचे काम मूर्तिकार करत होते. त्यामुळे या कामात व्यग्र झाले होते, परंतु सार्वजनिक मंडळ, तसेच घरगुती गणेशाची मूर्ती केंद्रातून नेल्या जात असल्याने मूर्तिकारांसह कामगारांना विश्रांती मिळाली आहे.
पूजा साहित्याचे दर (रुपयांत)
केवडा पान १००
दुर्वा कंठी १००
फुलांची कंठी १०० ते १५०
नारळ ६०
काकडी (वाटा) ५०
कमळ १०
पपनस ६० ते १००
कापूर (किलो) १४०० ते १५००
चौरंग १५० ते २००
तांब्याचा तांब्या ३५० ते ५००
वसई तालुक्यातील गणेशमूर्ती
घरगुती ३३,१०७
सार्वजनिक ९१४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.